डॉ. अमेय देसाई यांचा कोकण रत्न पुरस्काराने सन्मान

Edited by: भरत केसरकर
Published on: October 30, 2023 11:21 AM
views 57  views

मुंबई : मुंबईतुन इंटर्नल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर शिक्षण सुरु असतानाच सार्वजनिक आरोग्याविषयी काहीतरी करायची तळमळ सुरु झाली. आपण घेत असलेल्या शिक्षणाचा खेडोपाड्यातील गरीब गरजू तबक्यासाठी उपयोग झाला पाहिजे या भावनेतून त्यांनी महाराष्ट्रातील दुर्गम भागातील जनतेसाठी अनेक वैद्यकीय शिबिरे, शैक्षणिक मार्गदर्शने, बालरोग शस्त्रक्रिया शिबिरे असे अनेक उपक्रम करून हजारो लोकांचे जीवनमान उंचावण्यास मदत केली आहे. सार्वजनिक आरोग्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सार्वजनिक आरोग्य कार्यकर्ते, लेखक, सामाजिक अभियंता, मुलाखतकार अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाला म्हणजेच कोकण कोहिनुर डॉक्टर अमेय देसाई यांना या वर्षीच्या कोकण संस्थेच्या १२ व्या वर्धापन  दिनानीमित्त मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात राज्यस्तरीय कोकण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याचबरोबर कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अभिनेत्री दीपा परब यांनाही राज्यस्तरीय कोकण रत्न या सन्मानाने सन्मानित करण्यात आले. 

दादर, मुंबई येथे आज पार पडलेल्या कार्यक्रमात डिजिटल सोशल चेंज मेकर म्हणजेच टॉप १२ रीलस्टारना रील टू रिअल या पुरस्काराने सौ. दीपा परब यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यात सई उतेकर, तन्मय पाटेकर, बिनधास्त गर्ल गौरी पवार, रोशन पुजारी, किरण पास्ते, सायली इंदुलकर, साहिल दळवी, प्रथमेश  कदम, अमित  कुबडे, निखिल  सकपाळ, अनमोल  यादव, अंकिता प्रभू वालावलकर यांचा सत्कार करण्यात आला. 

डॉ. अमेय देसाई यांच्या हस्ते शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी आणि आपले ध्येय गाठण्यासाठी कार्यरत असणाऱ्या महिलांचा  झिरो टू हिरो या पुरस्काराने सन्मान करण्यात आला यामध्ये पुणे मावळ विभागातील ग्रामसेविका सौ. प्रतिभा विठ्ठल कुंभार,तर ठाणे ग्रामीण आणि आदिवासी विभाग शहापूरच्या सौ तारा सांगळे आणि श्रीमती पूजा कंठे, तर पालघर वाडाच्या सौ. रोशना निलेश पाटील आणि मानसी मनोज पानवे भिवंडी यांचा समावेश होता.

कोकण संस्था गेली १२ वर्षे शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, अनाथ मुलांसाठी वसतिगृह आणि महिला सक्षमीकरण यासारख्या विविध क्षेत्रांच्या विकासासाठी काम करत आहे. या कार्यक्रमात संस्थेच्या ग्रामीण भागातील भागधारकांनी मंगळागौर नृत्य सादर करून लोकांकडून वाहवा मिळवली आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

डॉ. देसाई यांनी कोकण रत्न मिळाल्याबद्दल कोकण संस्थेचे आभार मानले आणि कोकण संस्थेसारख्या काम करणाऱ्या संस्थाची समाजाला नितांत गरज असल्याचे सांगितले.तसेच कोकण संस्था समाजासाठी करत असलेले काम खरोखर खूप प्रशंसनीय असून प्रेरणादायी आहे, असे पुढे म्हणाले.

काशिनाथ धुरू हॉल मध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रमुख अतिथी सौ. गीताली पवार, श्रीमती अमृता माने, संदीप सिंग, विशाल महांगरे, संस्था व्यवस्थापक साक्षी पोटे, प्रीती पांगे, सुरज कदम सह संस्थेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन अभिनेते अक्षय ओवळे यांनी तर आभार संस्थाध्यक्ष दयानंद कुबल यांनी मांडले.