शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या माफियांना तालुक्यात येऊ देऊ नका : दीपक केसरकर

Edited by:
Published on: November 13, 2024 17:14 PM
views 55  views

दोडामार्ग : सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांच्या जमिनी तुटपुंज्य रकमेने खरेदी करून मोठ्या कंपन्यांना विकून कोट्यवधी रुपये कमविले आहेत. तेच आता विधानसभा निवडणूक लढवित आहेत. असा आरोप नाव न घेता केसरकर यांनी अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्यावर लगावला आहे. तसेच शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या माफियांना यापुढे तालुक्यात येऊ देऊ नका. नाहीतर भविष्यात अजूनही येथील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होऊ शकते असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

दोडामार्ग प्रचारार्थ दौऱ्यानिमित्त माटणे मतदार संघात  झरेबांबर येथे सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले बाळा गावडे, तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) सत्यवान गवस, भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, उपजिल्हा प्रमुख राजेंद्र निंबाळकर, तुकाराम बर्डे, दादा देसाई, तिलकांचन गवस, रामदास मेस्त्री, सूर्यकांत गवस, चंदू मळीक, विठोबा पालयेकर, दया धाऊस्कर, अनिल शेटकर, हर्षद सावंत, महिला तालुकाप्रमुख चेतना गडेकर, सानवी गवस, पूजा देसाई, श्रुती देसाई, श्रद्धा नाईक, आदी अनेक सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते. केसरकर म्हणाले की, तालुक्यातील प्रत्येक गावावर माझे प्रेम आहे. मी, मंत्री झाल्यापासून ज्या ठिकाणी विकास कामांसाठी निधी मागितला गेला त्यासाठी मी भरघोस निधी दिलेला आहे. आतापर्यंत झालेली कामे मी माझ्या कारकिर्दीत केली आहेत. तरीही विरोधक टीका करीत आहेत. मात्र, त्यांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून मी माझे काम करत आहे. येणाऱ्या काळात प्रत्येक घटकांसाठी आम्हीं मास्टर प्लॅन तयार केला आहे. त्यातून तालुक्यातील प्रत्येक घटकाचा आर्थिक विकास होणार साधता येणार.

तुटपुंज्या रकमेने शेतकर्यांचा जमिनी खरेदी करून काहीजण कोट्यवधी रुपये कमवत आहेत. तेच आता विधान सभेची निवडणूक लढवित आहेत. आतापर्यंत त्यांनी शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. त्यामुळे अशा उमेदवारांना थारा देऊ नका. नाहीतर भविष्यात अजूनही येथील शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते. दोडामार्ग मधील जनाता सुज्ञ आहे. येथील जनता खऱ्या खोट्याचा लेखाजोखा करण्याची बुद्धिमत्ता त्यांच्यात आहे. या भागाला वाचवायचे असेल व विकासात्मक बदल घडवायचा असेल तर महायुतीला म्हणजे मला मतदान करून निवडून द्या आवाहन केसरकर यांनी केले आहे.