
वैभववाडी : करुळ घाटासहीत तळेरे-वैभववाडी महामार्गाची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी.याकरिता स्थानिक ठेकेदार व लोकप्रतिनिधींची मदत घ्या.तात्काळ दुरुस्ती कामाला सुरुवात करून जनतेला रस्ता निर्धोक बनवून द्या.अशा सुचना आ.नितेश राणे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.तसेच काम वेळेत न केल्यास आम्हाला चुकीचे पाऊल उचलायला भाग पाडू नका असा इशाराही त्यांनी दिला.
आ. नितेश राणे यांनी आज करुळ घाटाची पाहणी केली.यावेळी त्यांनी घाटातील रस्ता, गटारे यांच्या दुरावस्थेसहीत तळेरे-वैभववाडी महामार्गाच्या खड्डेमय अवस्थेवरून अधिका-यांना धारेवर धरले. घाटातील पाहणी दौऱ्यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी,आमदारांसमोर या विभागाच्या तक्रारींचा पाढा वाचला.अधिकारी घाटात फिरकत नाही, आपत्कालीन परिस्थितीत या विभागाचा जेसीबी उपलब्ध होत नाही या बाबी पदा़धिका-यांनी निदर्शनास आणून दिल्या.तसेच तळेरे-वैभववाडी मार्गाचे खड्डे मातीने बुजविण्याचे काम सुरू असल्याचे पदाधिकाऱ्यांनी आमदारांच्या लक्षात आणून दिले.यावरून आमदारांनी अधिका-यांना खडेबोल सुनावले.पावसाळी डांबराने हे खड्डे का बुजवले जात नाही असा सवाल आ.राणे यांनी अधिकाऱ्यांना विचारला.जनतेचा पैसा जनहिताच्या कामासाठी खर्च करायचा असतो.तुम्ही आपल्या खिशातून पैसे देत नाही आहात .त्यामुळे या कामासाठी जो लागेल तो निधी खर्च करावा अशी सूचना त्यांनी दिली.तसेच अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच करूळ घाटाची दुर्दशा होत आहे,असा आरोपही त्यांनी केला. घाटातील गटारेे साफ करून खड्डे तात्काळ भरा.कुठलीही कारणे ऐकून घेणार नाही,असे राणे यांनी अधिकारी यांना सांगितले. गटार व खड्डे भरण्याचे काम त्वरित सुरू केले जाईल व घाटात जेसीबी कायमस्वरूपी उपलब्ध केला जाईल असे अधिकारी श्री.शिवनिवार यांनी सांगितले.
घाटाच्या पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले, इरशाळवाडी सारखी घटना येथे घडवू नये, यासाठी आम्ही काळजी घेत आहोत. एडगावपासून करुळ घाटापर्यंत खड्डे खूप आहेत ही वस्तुस्थिती आहे. मात्र येणाऱ्या काही दिवसात हा मार्ग निर्धोक होईल. भुईबावडा घाटाप्रमाणे हा देखील मार्ग केला जाईल. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे काम आपल्याला सर्वांना माहीत आहे. जिल्ह्यातील विकास कामांकडे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे देखील लक्ष ठेवून आहेत. मागिल अधिवेशनात पालकमंत्री चव्हाण यांनी या घाटासाठी निधीची घोषणा केली आहे. लवकरच घाटाच ग्रहण कायमस्वरूपी सुटेल असे ठाम पणे नितेश राणे यांनी सांगितले.
यावेळी तहसीलदार दिप्ती देसाई, गटविकास गटविकास जयप्रकाश परब, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगाडे भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, प्रमोद रावराणे, जयेंद्र रावराणे, अरविंद रावराणे, भालचंद्र साठे, नेहा माईणकर, सुधीर नकाशे, सज्जन काका रावराणे, दिगंबर मांजरेकर, संजय सावंत, महीला तालुका अध्यक्ष प्राची तावडे, नवलराज काळे, प्रदीप नारकर, रोहन रावराणे, संताजी रावराणे, सुभाष रावराणे, प्रकाश सावंत, योगेश पाथरे तसेच सर्व नगरसेवक व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
तालुक्यातील करुळ घाटाची पाहणी करण्यासाठी आ.नितेश राणे हे वैभववाडीत आले होते.पाहणीनंतर माध्यमांशी बोलताना,आ.राणे म्हणाले वैभववाडी -तळेरे मार्ग लवकरात लवकर खड्डेमुक्त केला जाईल.तो निर्धोक करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.परंतू जे अधिकारी नीट काम करणार नाहीत त्यांचं काय करायचं ते आम्ही पाहू.आमच्याकडे बुस्टर डोस आहे.तो आमच्या खिशातच असतो असं सांगत एकप्रकारे अधिका-यांना इशाराही दिला.तसेच हा डोस देण्याची वेळही येणार नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केले.