दहावी - बारावीचा पल्ला गाठल्यानंतर मर्यादित क्षेत्रच निवडू नका : युवराज लखमराजे भोसले

Edited by: विनायक गावस
Published on: June 15, 2023 15:03 PM
views 68  views

सावंतवाडी : कौशल्य विकासावर आधारित असणारे व आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडीत असे ज्ञान आजच्या विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे. दहावी व बारावीचा पल्ला गाठल्यानंतर मर्यादित क्षेत्रच निवडू नका, व्यापक विचार करा असे मत युवराज लखमराजे भोसले यांनी व्यक्त केले.

सावंतवाडी संस्थानच्या राजवाड्याला कुडाळ हायस्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांनी भेट दिली. यावेळी त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या कार्याध्यक्षा सौ. शुभदादेवी सावंत भोसले व युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व रोख रकमेचे बक्षीस देण्यात आले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते काका मांजरेकर, कुडाळचे सदासेन सावंत व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सदासेन सावंत यांनी केले.

कुडाळ हायस्कूलमधील इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थी वरद माईनकर, राधिका तेरसे, युतिका पालव, शांभवी परब, अन्वय पाटकर, स्वस्तिका दुधगावकर यांचा सत्कार करण्यात आला. शुभदादेवी भोंसले यांनी विद्यार्थ्यांनी दहावीत केलेल्या अभ्यासाबाबत माहिती घेतली व पुढील शिक्षणाबाबत मार्गदर्शन केले. सावंतवाडी संस्थानच्या राजघराण्याशी कुडाळ शहरवासियांचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे कुडाळच्या विद्यार्थांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी शुभदादेवी व युवराज लखमराजे यांनी विद्यार्थ्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. समाजसेवक सदासेन सावंत यांनी स्पष्ट केले की, जिल्ह्यात हालाकीच्या परिस्थितीत दहावीत कोणतेही क्लास वर्ग न घेता स्वतः शिक्षकांनी शिकविलेल्या अभ्यासावर दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन यश मिळविलेल्या गरीब विद्यार्थ्यांचा संस्थानच्या राजघराण्यातील मंडळीच्याव्यावतीने लवकरच गुणगौरव समारंभ केला जाणार आहे.

यावेळी विद्यार्थ्यांचे पालक गिरीष माईणकर, डॉ. जमील दुधगावकर, डॉ. सौ. मुक्ता दुधगावकर, गजानन पालव महेंद्र परब, मोहिनी परब आदी उपस्थित होते.