
सावंतवाडी : एक उमेदवार पैसा अक्षरशः ओततोय तर दुसऱ्याच्या खिशातून कार्यकर्त्यांच्या चहाचेही पैसै निघत नाहीत असा जोरदार हल्लाबोल महायुतीचे उमेदवार तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विरोधी उमेदवारांवर नाव न घेता केला. स्वार्थाच्या भाकऱ्या भाजून घेणारी ही मंडळी आहेत. यांना त्यांची जागा दाखवून द्या असे आवाहन श्री. केसरकर यांनी केले. शहरात त्यांनी रविवारी झंझावाती प्रचार केला. यावेळी ते बोलत होते.
केसरकर म्हणाले, जमिनी लुबाडणाऱ्याने एक तरी हॉटेल उभारले का ? महिला, युवकांना रोजगार दिला का ? मी पंचवीसशे कोटींची विकासकामे मागच्या पाच वर्षातच केली. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालीय असं काम मी मंत्री म्हणून केलं आहे. मी तुमची काम केलीत. राजन तेलींनी फक्त लोकांना भडकवायच काम केलं. आग लावायची काम केली. यांच्या भाकऱ्या या स्वार्थाच्या आहेत. ते भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना थारा देऊ नका, त्यांची जागा दाखवून द्या असे आवाहन श्री. केसरकर यांनी केले.
तर राज्यातील जबाबदारीमुळे मतदारसंघात फिरता आले नसले तरी माझा लक्ष तुमच्यावर असतो. तुमची सगळी कामं मी केली आहेत. २० तारीखला माझ्या विरोधात बोलणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या. आपला विजय निश्चित आहे. मोठं मताधिक्य माझ्यामागे उभे करा असे आवाहन श्री. केसरकर यांनी केले. सावंतवाडी शहरातील आठही प्रभागात केसरकर यांच्याकडून झंझावाती प्रचार करण्यात आला. यावेळी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.