भाजपा पदाधिकाऱ्यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांची मुंबईत घेतली भेटी

तालुक्यातील रस्ते व अन्य विकासासाठी केली चर्चा
Edited by: संदीप देसाई
Published on: August 27, 2022 18:33 PM
views 209  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची विधानभवनात नुकतीच भेट घेतली. यावेळी तालुक्यातील रस्ते व अन्य विकासकामांना प्राधान्याने निधी मिळावा, अशी मागणी या भेटी दरम्यान पदाधिकाऱ्यांनी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.

     भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली दोडामार्ग भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, नगरसेवक संतोष नानचे, चंदू मळीक शक्तीकेंद्र प्रमुख प्रवीण गांवकर आदींनी श्री. चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी तालुक्यातील विविध विकासकामाची निवेदन देण्यात आली. तालुक्यातील महत्वाच्या रस्त्यांची दुरावस्था कायम आहे. त्याची दुरुस्ती होण्यासाठी प्राधान्याने निधी देण्यात यावा. तसेच अन्य विकासकामांना निधी मिळावा अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी तालुक्यातील विकासाबाबत मी सकारात्मक आहे. लवकरच विकास कामाचा आढावा घेऊन नियोजन करण्यात येईल. तालुक्याला निधीची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही श्री. चव्हाण यांनी दिली असल्याची माहिती नाडकर्णी यांनी दिली आहे. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी दोडामार्ग मध्ये पक्ष संघटना बांधणीबाबतही पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

दरम्यान, या पदाधिकाऱ्यांनी माजी खासदार निलेश राणे यांचीही भेट घेऊन चर्चा केली.