दोडामार्ग केळीचं टेंब इथं कार पलटी

Edited by: लवू परब
Published on: November 05, 2025 20:33 PM
views 130  views

दोडामार्ग : दोडामार्ग केळीचेटेंब येथील धोकादायक वळणावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची घटना बुधवारी दुपारी ३:३० वागण्याच्या सुमारास घडली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून चालकासह महिला व मुलगी किरकोळ जखमी झाले.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, गोवा येथील एक कुटुंब त्यांच्या हुंडाई क्रेटा कारने तिलारी परिसरातील एका गावात नातेवाईकांकडे गेले होते.  दुपारी ते गोव्याकडे परत जात असताना दोडामार्ग ते विजघर राज्य मार्गावरील केळीचेटेंब येथील वळणावर आले असता त्यांच्या कारसमोर अचानक दुसरे वाहन आले. त्यामुळे बचावासाठी चालकाने कार बाजूला घेतली. दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊन लोखंडी दूरध्वनी खांब व झाडावर आदळली आणि पलटी झाली.

अपघातानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनचालकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कारमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढले. या अपघातात कारमधील तिघेजण किरकोळ जखमी झाले. मात्र, कारचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सायंकाळी ४ वा.च्या सुमारास क्रेनला पाचारण करण्यात आले व कार बाहेर काढली.