दोडामार्गात ‘नशा मुक्त जनजागृती पदयात्रा’

Edited by: लवू परब
Published on: November 04, 2025 19:42 PM
views 20  views

दोडामार्ग : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने दोडामार्ग तालुक्यात नशा मुक्त समाज घडविण्याच्या उद्देशाने भव्य ‘नशा मुक्त जनजागृती पदयात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. ही पदयात्रा दिनांक ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता दोडामार्ग जिल्हा परिषद शाळा क्र. १ च्या मैदानातून प्रारंभ होणार आहे.

या पदयात्रेत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, महसूल प्रशासनाचे प्रतिनिधी, पोलीस पाटील, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट, सीआरपी, आशा व अंगणवाडी सेविका, एनएसएस व एनसीसी विद्यार्थी, युवक मंडळे, सामाजिक कार्यकर्ते तसेच माजी सैनिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

पदयात्रेचा मुख्य उद्देश ग्रामस्तरावर नशा विरोधी जनजागृती करणे, तरुण पिढीला सकारात्मक व व्यसनमुक्त जीवनशैलीकडे वळवणे आणि ग्रामपंचायतींना सर्वांगीण समृद्धतेच्या दिशेने प्रेरित करणे हा आहे. कार्यक्रमास प्रमुख मान्यवर, प्रशासकीय अधिकारी, पोलीस विभागाचे प्रतिनिधी तसेच स्थानिक नेतृत्व उपस्थित राहणार आहे. पदयात्रेनंतर झरे-२ येथील शरद क्षेत्र फंक्शन हॉलमध्ये जनजागृतीपर संदेश, नशाबंदी शपथ आणि संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती गटविकास अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.