दादा राणे कोनसकर यांना ठाणे कला गौरव पुरस्कार

Edited by: लवू परब
Published on: November 04, 2025 15:27 PM
views 22  views

दोडामार्ग : कोनशी गावचे सुपुत्र असलेले दादा राणे कोनसकर यांना ठाणे कला गौरव पुरस्कार २०२५ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. सावंतवाडी तालुक्यातील कोनशी गावचे दादा कोनसकर यांचा दशावतार क्षेत्रातील प्रवास अद्वितीय असाच आहे. त्यांचे आजोबा कै. बाबुराव राणे, वडील कै. बाबा राणे व काका कै.दाजी राणे यांच्या नंतर दादा कोनसकर यांचे बंधू उदय कोनसकर हे सध्या दशावतार मधील प्रचंड लोक आवडीचे कलाकार आहेत. यांच्या सह या कोनसकर घराण्याचे चौथ्या पिढीचे आणि दादा चे चिरंजीव राम कोनसकर हे देखील भूमिका आणि नव नवीन नाट्य कला कृती आपल्या संकल्पनेतून व लेखनातून रसिक भेटीला आणत आहे.या सर्वाचा गोवा, सिंधुदुर्ग, मुंबई, पुणे आदी ठिकाणी  मोठा चाहता मित्रपरिवार आहे. आजवर दादांचा खलनायक पाहण्यासाठी मोठी गर्दी नाट्यप्रयोगाच्या वेळी ठिकठिकाणी असते. सध्या ट्रिकसीनचे नाट्यप्रयोग दशावतारक्षेत्रात नवनवीन येत आहेत. या ट्रिकसीनचे खरे निर्माते दादा राणे कोनसकर आहेत. अनेक ट्रिकसीनची दर्जेदार नाट्यपुष्पे त्यांनी रसिक भेटीला आणली. श्री स्वामी समर्थ हे ट्रिकसीन युक्त नाटक प्रचंड पसंतीला येत गाजले देखील होते. यांसह पौराणिक, काल्पनिक नाटके देखील लोक पसंतीला आले. अनेक वर्षे कोनसकर घराणे दशावतार क्षेत्राला योगदान देत आहे. या त्यांच्या कार्याची दखल घेत अनेक ठिकाणी गौरव झाला. अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २०२५ चा मानाचा समजला जाणारा ठाणे कला गौरव पुरस्कार सावरकर नगर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिफारशीनुसार वितरण करण्यात आले. ठाणे महोत्सवाचे सर्वेसर्वा दिलीप बारटक्के यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार दादा राणे कोनसकर यांना वितरित करण्यात आला.

दशावतार क्षेत्रातील अनेक वर्षाची यशस्वी कारकिर्द लक्षात घेत सावरकर नगर ठाणे येथील मंडळाने दादा राणे कोनसकर यांचा रोख रक्कम 25,000 मानधन देऊन गौरव केला, पण ही रक्कम न स्वीकारता पुनश्च मंडळाचे सर्वसर्वां दिलीप बारटक्के यांच्या कडे सुपूर्द केली. ही रक्कम आपत्ती मदत निधी कक्ष मध्ये जमा केली आहे.आणि या रकमेचा उपयोग एखाद्या दशावतार कलाकार वर संकट आले असेल तर त्याला आर्थिक मदत म्हणून ही रक्कम दादा नी देण्याचे ठरविले, हा असा निर्णय मोठ्या मनाचा कलाकार घेऊ शकतो, या यांच्या निर्णयामुळे कोनसकर यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. ठाणे महोत्सव चे सर्वेसर्वा दिलीप बारटक्के हे गेली अनेक वर्षे सर्व मंडळाची मुंबईत राहण्याची व्यवस्था करत आहेत. या बद्दल कोनसकर यांनी त्यांचे आभार मानलेत.