
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील दुर्गम गावात घरोघरी जाऊन आरोग्यसेवा देणाऱ्या डॉ. रवींद्र मांगले यांचा विशेष सत्कार सोहळा तळेखोल येथे पार पडला. गडहिंलग्ज, महागाव (कोल्हापूर) येथील डॉ. मांगले असून ग्रामीण गावांत फिरती आरोग्य सेवा ते देत आहेत. सिंधुदुर्गचे मराठा महासंघ उपाध्यक्ष अॅड सोनू गवस यांच्या शुभ हस्ते हा सत्कार संपन्न झाला.
यावेळी अॅड. सोनू गवस यांच्यासमवेत पत्रकार तेजस देसाई, तिलारी धरणग्रस्त समितीचे पदाधिकारी शशीकांत गवस, रामकृष्ण दळवी, शितल दळवी, सिद्धेश गावस, संजय गावस, बाबाजी दळवी, मंगल दळवी, उज्वला गावस, सुरेश गावस, सुमित्रनाथ गवस आदी उपस्थित होते.
अविरत सेवा कार्य सुरुच ठेवणार : डॉ. मांगले
यावेळी डॉ. मांगले म्हणाले, आपण आजपर्यंत १८८ गावात स्वतः जाऊन आरोग्यसेवा दिली. कोरोना काळातही ही सेवा बंद केली नाही. दोडामार्ग तालुक्यातील केर भेकुर्ली पासून तळेखोल, विर्डी पर्यंत अनेक गावांत घरोघरी आरोग्यसेवा देत आहे. तळेखोलमध्ये झालेला आपला सन्मान हा नेहमीच स्मरणात राहिल. अनेक गावात आपणास प्रेम मिळत आहे त्यामुळे तिथल्या ग्रामस्थांशी नातं निर्माण झाले आहे यापुढेही आरोग्यसेवेचे काम सुरूच ठेवणार.
समाजाला डॉ. मांगले यांच्यासारख्या व्रतस्थ व्यक्तीची गरज - सोनू गवस
गवस म्हणाले, समाज सशक्त बनण्यासाठी आणि गोरगरिबांना सेवा मिळण्यासाठी समाजात काही मोजकी माणसं मनापासून काम करत असतात. डॉ. मांगले हे आरोग्यसेवेचे व्रत घेऊन गावोगावी फिरत आहेत. अशा व्रतस्थ व्यक्तीची गरज समाजाला आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामकृष्ण दळवी यांनी तर सूत्रसंचालन महेंद्र गवस यांनी केले. यावेळी अनेकांनी डॉ. मांगले यांच्या कार्याचे कौतुक केले.










