
दोडामार्ग : पिकुळे शेळपीवाडी येथे पिढ्यानपिढ्या चालू असलेला रहदारीचा बंद केलेला रस्ता खुला करावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते लवू रामा नाईक यांनी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर बुधवारी सकाळी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. प्रशासनाने यावर कोणताही तोडगा न काढल्याने तिसऱ्या दिवशीही कुपोषण सुरू राहिले व उपोषणकर्ते लवू नाईक यांची प्रकृती खालावली. परिणामी प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांनी कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने हे उपोषण मागे घेतले.
आमरण उपोषणास बसण्यापूर्वी सामाजिक कार्यकर्ते लवू नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिले होते. त्या निवेदनात म्हटले आहे, गट क्रमांक व उपविभाग २१४ मधील मसणवट (क्षेत्रफळ ०.३९ हे.) या शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या सर्व प्रकारांना ग्रामपंचायत पिकुळेने पाठबळ दिल्याचा आरोप नाईक यांनी केला आहे. स्थानिक पातळीवर तक्रारी करूनही संबंधितांवर कोणतीही कारवाई झाली नसल्याने ग्रामपंचायतीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच भागातून पिढ्यानपिढ्या स्थानिक ग्रामस्थ रहदारीसाठी वापरत असलेला सार्वजनिक रस्ता अचानक २७ जुलै २०२४ रोजी एका व्यक्तीने जबरदस्तीने बंद केला. या संदर्भात ग्रामसभा, तंटामुक्ती बैठक, ग्रामपंचायतीची मासिक सभा अशा सर्व ठिकाणी एकमताने रस्ता पूर्ववत खुला करावा, असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, ग्रामपंचायत अद्यापही कोणतीही कारवाई करत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
प्रशासन कोणतीही कार्यवाही करत नसल्याने बुधवारपासून त्यांनी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली. धर्मा नाईक व राजू नाईक यांनी या उपोषणात सहभाग घेतला. प्रशासनाने मात्र या उपोषणाची कोणतीही दखल घेतली नाही. परिणामी तिसऱ्या दिवशी लवू नाईक यांची प्रकृती खालावली. साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी त्यांची तपासणी केली. तसेच रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. मात्र जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत येथून हटणार नाही असा आक्रमक पवित्रा लवू नाईक यांनी घेतला. परिणामी प्रशासनाची नाचक्की झाली आणि प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत चर्चा केली. शासन निर्णयानुसार आपल्या मागण्यांवर योग्य ती कार्यवाही केली जाईल असे लेखी आश्वासन दिल्याने उपोषणकर्त्यांनी हे उपोषण तूर्तास मागे घेतले.










