
दोडामार्ग : सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या नूतन कार्यालयीन इमारत बुधवारपासून नागरिकांच्या सेवेसाठी खुली झाली असून तिचे उद्घाटन पालकमंत्री तथा मत्स्य व बंदर विकासमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
नवीन कार्यालयीन इमारत सुसज्ज, प्रशस्त आणि आधुनिक सोयीसुविधांनी युक्त असून गुणवत्तापूर्ण व ठरलेल्या वेळेत पूर्ण झाल्यामुळे ती स्थानिकांसाठी कामकाजासाठी महत्वाची ठरली हॊती. या इमारतीतून पारदर्शक कारभार व्हावा, नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडविल्या जाव्यात तसेच कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सन्मानाची वागणूक मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करताना पालकमंत्री श्री राणे म्हणाले की, ही कार्यालयीन इमारत जनतेच्या विश्वासाचे प्रतीक आहे. म्हणूनच येथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी जनतेला न्याय देणे हे आपले पहिले कर्तव्य मानावे. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे व उत्तरदायित्व जपणारे कार्यालय म्हणून या इमारतीतून नवा इतिहास घडावा, असेही ते म्हणाले.
तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकाळात जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांचा आज जिल्हावासीयांना थेट फायदा होत आहे. जिल्ह्यातील रस्त्यांचे जाळे मोठ्या प्रमाणावर विस्तारल्यामुळे गावोगावी दळणवळण सुलभ झाले असून विकासाच्या प्रक्रियेला नवी गती मिळाली आहे. गेल्या काही महिन्यांत जिल्ह्यातील अनेक विश्रामगृहांची दुरुस्ती करून ती नागरिकांसाठी अधिक सोयीस्कर करण्यात आली आहे. याशिवाय, दोडामार्ग येथे नवीन विश्रामगृह उभारणीसाठी निधी देण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये प्रलंबित असलेल्या रिक्त पदांची लवकरात लवकर भरती करून प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत सर्व विभागांनी जनतेच्या हितासाठी नवनवीन उपक्रम राबवावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या प्रसंगी प्रभाकर सावंत तसेच कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी कार्यकारी अभियंता पूजा इंगवले, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, जिल्हा बँक चेअरमन मनीष दळवी, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, भाजप तालुकाध्यक्ष दीपक गवस, शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, युवक प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले, माजी तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, रमेश दळवी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, झरे सरपंच श्रुती देसाई, हेवाळे सरपंच साक्षी देसाई, कोलझर सरपंच सुजल गवस, मोर्ले सरपंच संजना धुमास्कर, कळणे सरपंच अजित देसाई, संतोष नानचे, शिवसेना तालुका संघटक गोपाळ गवस, तहसीलदार प्रज्ञा राजमाने, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले, उप विभागीय अधिकारी सीमा गोवेकर, कनिष्ठ अभियंता संभाजी घंटे, ठेकेदार स्वप्नील बापूसाहेब देसाई, सुयश राजेसाहेब राणे आदी उपस्थित होते.