
दोडामार्ग : तालुका आरोग्य अधिकारी यांच्या नवीन इमारतीचं ऑनलाईन उद्घाटन होऊन पाच महिने झाले तरी देखील लोकसवेसाठी सुरू झाली नाही. ही इमारत येत्या आठ दिवसांत खुली करून इथून तालुक्याचा कारभार सुरू न झाल्यास आमरण उपोषण याच इमारतीच्या प्रवेशद्वारावर केले जाईल असा इशारा सरपंच सेवासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी दिला आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते १० एप्रिल २०२५ रोजी ऑनलाईन पद्धतीने तालुका आरोग्य अधिकारी यांच्या नवीन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. ही वास्तू ग्रामीण रुग्णालयाच्या मागे असून गेले ५ महिने बंद अवस्थेत आहे. जर या इमारतीचे लोकार्पण झाले तरी या इमारतीतून तालुका आरोग्य विभागाचा कारभार चालण्यास प्रारंभ होण्यास कोणत्या मुहूर्ताची वाट पाहिली जात आहे असा सवाल गवस यांनी केला आहे.
सोमवारी नवीन इमारतीच्या ठिकाणी त्यांनी पाहणी केली असता, इमारतीची कामे पुर्ण केलेली निदर्शनास आली आहेत. या इमारतीकडे जाण्यासाठी आवश्यक पक्का रस्ता नसल्याने गैरसोय होत आहे. इमारतीचे काम पूर्ण पण रस्ता नसल्याने घाईगडबडीत लोकार्पण का केले आणि लोकार्पण केल तर आरोग्य विभागाचा कारभार या इमारतीतून का चालविला जात नाही. हे अयोग्य असून आठ दिवसात नवीन वास्तूमधून आरोग्य विभागाचा कारभार हाकला जावा अन्यथा आमरण उपोषण छेडू असा इशारा गवस यांनी दिला आहे.