
दोडामार्ग : झरे - २ (सरगवे पुनर्वसन) गावचे सुपुत्र राहुल अजय सावंत (आसाम रायफल), यांनी राष्ट्रीय स्तरावरील द सप्तशक्ती हाॅर्स शो २०२५, जयपूर या प्रतिष्ठित स्पर्धेत घोडेस्वारीच्या विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करत एक सुवर्ण, दोन रौप्य आणि तीन कांस्य अशा एकूण ६ पदकांची कमाई केली आहे. त्यांच्या या दैदीप्यमान यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
रिंग अॅण्ड पेग या वैयक्तिक स्पर्धेत प्रथम क्रमांकासह एक सुवर्णपदक पटकावले. या प्रकारात स्पर्धकाला घोड्यावर बसून वेगात जाऊन जमिनीवर ठेवलेल्या छोट्या रिंग्जला भाल्याने भेदावे लागते. यासाठी अचूक लक्ष्य, समतोल आणि वेग आवश्यक असतो. इंडियन फाईल या सांघिक स्पर्धेत रौप्यपदक (दुसरा क्रमांक) पटकावलं. या स्पर्धेत घोडेस्वारांनी एका रेषेत अत्यंत शिस्तबद्ध आणि समन्वय साधून ठरावीक पद्धतीने सादरीकरण करणे अपेक्षित असते. पेअर टेन्ट पेगिंग स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. यात दोन घोडेस्वार एकत्रितपणे शर्यतीसारख्या प्रकारात जमिनीवरील टेन्ट पेग्ज ( खिळे ) उचलतात. स्वॉर्ड टीम स्पर्धेत कांस्यपदक, यात तलवारीच्या साहाय्याने विविध लक्ष्ये भेदण्याची सांघिक कला असते. लान्स टीम स्पर्धेत रौप्यपदक, यात भाल्याच्या साहाय्याने दिलेल्या उद्दिष्टांना भेदणे, संपूर्ण सांघिक समन्वयात व सांघिक एकत्रित गुणांमध्ये कांस्य पदक यात सर्व प्रकारांतील एकत्रित गुणांच्या आधारे संघाला तिसरा क्रमांक प्राप्त होतो.
अर्जुन पुरस्कार प्राप्तलेफ्टनंट अजय अनंत सावंत यांचे ते ज्येष्ठ पुत्र असून, सुभाष दळवी यांचे भाचे आहेत. लष्करी परंपरेतून आलेल्या राहुल यांनी आज आपल्या गावाचा आणि जिल्ह्याचा नावलौकिक राष्ट्रीय स्तरावर पोहोचवला आहे. राहुल यांची ही कामगिरी दोडामार्ग तालुक्यासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.