
दोडामार्ग : कसई - दोडामार्ग नगराचा करण्यात आलेला विकास आराखडा नागरिकांच्या हिताचा नसल्याचे लक्षात येतात नगरपंचायत प्रशासनाकडून तो आराखडा रद्द करण्यासाठी घेण्यात आलेल्या ठरावाचे आम्ही अभिनंदन करतो. नागरिकांच्या हिताचा आराखडा नव्याने तयार करून प्रत्येक प्रभागात प्रसिद्ध करून त्याची माहिती नागरिकांना देण्यात यावी. नागरिकांच्या घरादारावर नांगर फिरवणारा विकास आराखडा कायम करण्यात आला तर दोडामार्ग नगरातील नागरिक रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन छेडू असल्याचा निर्णय आज झालेल्या सभेत नागरिकांनी एकमताने घेतला.
दोडामार्ग नगराच्या प्रारूप विकास आराखड्याबाबत नगरपंचायत प्रशासनाकडून हा आराखडा रद्द करण्यात यावा असा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. करण्यात आलेला हा लोकांच्या हिताचा नसून त्यातून लोकांचे अहित करणार होता. यामुळे संपूर्ण नगरातील नगरवासीयांनी या विकास आराखड्याला विरोध करण्यासाठी हरकती नोंदविल्या होत्या. तब्बल १८० हरकती नोंदवून या प्रारूप आराखड्याला कडाडून विरोध केला होता. या आराखड्यामुळे शहरातील नागरिकांचे अतोनात नुकसान होणार होते. या आराखड्यात कोणाच्या घरावरून रस्ता जात होता तर, काही नागरिक बेघर होणार होते, तर काही नागरिक भूमीहीन होणारा हा आराखडा नागरिकांवर लादण्यात आला होता. ही बाब नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाच्या दर्शनास आणून देत या प्रारूप विकास आराखड्याला तीव्र विरोध दर्शविला.
त्यानंतर नगरपंचायत प्रशासनाने विशेष सभा आयोजित करून नागरिकांचा अहित करणारा हा प्रारूप विकास आराखडा रद्द करण्यासाठी विरोधक व सत्ताधाऱ्यांनी एकमताने ठराव घेतला. या ठरावाला बहुमताने सहमती देत नागरिकांच्या हिताचा निर्णय नगरपंचायत ने घेतलेला आहे. त्यांच्या या निर्णयाचे अभिनंदन करण्यासाठी व आराखड्याबाबत पुढील दिशा ठरविण्यासाठी गुरुवारी महाराज सभागृहात नागरिकांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला बहुतांश नागरिक उपस्थित होते. तयार करण्यात आलेला हा प्रारूप विकास आराखडा नागरिकांचे कसे आहेत करणार आहोत हे इतर नागरिकांना या सभेच्या माध्यमातून पटवून देण्यात आले.
प्राध्यापक संदीप गवस, सचिन कोरगावकर, गोविंद शिरोडकर व प्रदीप चांडेलकर यांनी या आराखड्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले. तसेच नगराचा विकास करणारा आराखडा कशा पद्धतीने हवा हे देखील नागरिकांच्या लक्षात आणून दिले. यावेळी मात्र उपस्थित सर्व नागरिकांनी एकच निर्णय ठामपणे घेतला. हा आराखडा रद्द होऊन नागरिकांचा हित जोपासणारा, सर्वांगीण विकासाला चालना देणारा आराखडा नव्याने तयार करण्यात यावा. ज्या ज्या ठिकाणी जमीन क्षेत्रावर अनावश्यक आरक्षणे घालण्यात आली आहेत ती रद्द झाली पाहिजेत. नागरिकांच्या घरादारावर नांगर फिरवणारा, भूमिहीन करणारा, बेघर करणारा हा आराखडा कायम राहिला तर नागरिकांचा जनक्षोभ उफाळून येईल, आम्ही सर्व नागरिक एकजुटीने रस्त्यावर उतरून उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा पवित्रा नागरिकांने आयोजित सभेत घेतला. या सभेला महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.