
दोडामार्ग : पंधरा दिवसात दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातील डायलिसीस सेंटर सुरू करण्याचे आदेश, प्रसूती मातांसाठी स्वतंत्र महिला कक्ष, पुरुष कक्षात तात्पुरते पार्टीशन, नवीन १०८ रुग्णवाहिका दोडामार्गला तर साटेली-भेडशी पंचक्रोशीसाठी, औषधांचा मुबलक साठा व पुरवठा, अपूर्ण इमारतीचे काम तातडीने पूर्ण करणे आणि त्यानंतर पदभरती करण्याचे प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर प्रवीण गवस यांचे उद्या सोमवारी ०८ सप्टेंबर रोजी होणारे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
दोडामार्ग रुग्णालयातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या आरोग्य समस्या आणि प्रशासनाची चालढकल कारभार अखेर उघडकीस आला आहे. सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तसेच मानवाधिकार सुरक्षा आणि संरक्षण संस्था जिल्हाध्यक्ष प्रविण गवस यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर जिल्हा प्रशासन धास्तावले आणि चर्चेला बसावे लागले. या तीव्र दबावामुळे प्रशासनाने लेखी हमी दिल्याने दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय येथे सोमवारी 08 सप्टेंबर रोजी होणारे जन आंदोलन अखेर मागे घेण्यात आले.
रुग्णालयातील दुर्लक्ष व निष्क्रियतेवर बोट ठेवत गवस यांनी आरोग्य विभागाला जागे केले. पंधरा दिवसांत डायलिसीस सेंटर सुरू करण्याचे आदेश, प्रसूती मातांसाठी स्वतंत्र महिला कक्ष, पुरुष कक्षात तात्पुरते पार्टीशन घालून प्रसूती कक्ष सुरु करण्या संदर्भात, तसेच नवीन १०८ रुग्णवाहिका देण्यासंदर्भात तर साटेली-भेडशी पंचक्रोशीसाठी, औषधांचा मुबलक साठा व पुरवठा, अपूर्ण इमारतीचे काम तातडीने पूर्ण करणे आणि त्यानंतर पदभरती करण्याचे प्रशासनाने लेखी आश्वासन दिले.
हे सर्व निर्णय आंदोलनाच्या टोकदार भूमिकेमुळे शक्य झाले असून, स्थानिक जनतेच्या वर्षानुवर्षांच्या मागण्या अखेर फळास आल्या आहेत. प्रशासनाने आता लेखी दिलेली ग्वाही तातडीने प्रत्यक्षात उतरवावी, अन्यथा यापुढे अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रविण गवस यांनी दिला आहे. या चर्चेस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, उपजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तुषार चिपळूणकर, दोडामार्ग रुग्णालयाचे डॉ. मसुरकर, डॉ. गुरव यांसह मानवाधिकार संघटनेच्या नमिता सावंत वतनुजा कोरगावकर उपस्थित होते.










