मोरगाव जि. प. शाळेत माजी विद्यार्थी स्नेहमेळावा

Edited by:
Published on: September 01, 2025 18:21 PM
views 37  views

बांदा : मोरगाव येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा मोरगाव नं.१ व मोरगाव गावठण या शाळांतील माजी विद्यार्थ्यांचा  स्नेहमेळावा मोरगाव जिल्हा परिषद केंद्र शाळेत मोठ्या उत्साहात   संपन्न झाला. या स्नेहमेळाव्यास सरपंच संतोष आईर अध्यक्षस्थानी होते. उपसरपंच देविदास पिरणकर, माजी सरपंच आप्पा कदम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय ठाकूर, सेवानिवृत्त कॅप्टन वामन नाईक, नंदलाल पिरणकर, सत्यवान नाईक,प्रमोद बांदेकर, मुख्याध्यापिका भाग्यश्री कुबल व भिकाजी गावडे यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पदवीधर शिक्षक ज्ञानेश्वर सावंत यांनी शाळेत राबविण्यात येणारे शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांची यशोगाथा आणि शाळेची सर्वांगीण प्रगती याबद्दल माहिती दिली. यानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील सुवर्णक्षणांना उजाळा दिला. अनेकांनी जिल्हा परिषद शाळेने घडवून आणलेला शिक्षणाचा भक्कम पाया जीवन प्रवासात कसा उपयोगी ठरला याचे अनुभव कथन केले. भविष्यातही शाळेच्या प्रगतीसाठी एकदिलाने सहकार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. एकत्र जमलेल्या सहाध्यायींनी परस्परांना भेटून आत्मीय संवाद साधला. यामुळे गावातील शैक्षणिक संस्कृती आणि परंपरा जिवंत असल्याचा प्रत्यय सर्वांना आला.

कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन मणिपाल राऊळ यांनी केले.  तर मेळावा यशस्वी आयोजनासाठी उपशिक्षिका स्वाती पाटील, स्नेहलता ढेकळे, अंगणवाडी सेविका हेमा नाईक, संगीता कदम, तसेच अनेक माजी विद्यार्थी यांनी मनापासून परिश्रम घेतले. या स्नेहमेळाव्यामुळे मोरगाव शाळेच्या इतिहासातील एक संस्मरणीय पान लिहिले गेले असून, शाळेचा लौकिक वाढविण्याचा संकल्प सर्व उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी केला.