
दोडामार्ग : महाराष्ट्रात सावित्री नदीवरील पूल काही वर्षांपूर्वी कोसळला होता. या दुर्घटनेत ४० लोकांचा मृत्यू झाला होता. अशीच काहीशी परिस्थिती दोडामार्ग बांदा राज्य मार्गावरील मणेरी येथील तिलारी नदीवरील सर्वात जुन्या पुलाची झाली आहे. पुलाच्या संरक्षक कठाड्याला भेगा जाऊन कठडा कोसळला आहे. यामुळे कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मणेरी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी करण्यात येत आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम उवविभाग दोडामार्गच्या अभियंता सीमा गोववेकर यांना विचारले असता या संदर्भात आपण वरिष्ठ पातळीवर तसा अहवाल पाठवून लवकर संरक्षक कठडा दुरुस्त करण्यात संदर्भात कार्यवाही करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
सासोली - मणेरी या दोन गावांना जोडणारा म्हणजेच दोडामार्ग बांदा मुख्य राज्यमार्गावरील मणेरी येथील तिलारी नदीवरील पुलाला साधारण ७० ते ८० वर्षे झाली आहेत. या पुलाच्या संरक्षक कठाड्यासहित पुलाचे मुख्य खांब झिजलेल्या अवस्थेत असल्याचे येथील ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. संरक्षक कठडा तर एका बाजूने कोसळला आहे. या संरक्षक कठड्याबरोबर पुलाच्या मध्यभागी रस्त्यावर खड्डा पडला. वाहन चालक हा खड्डा चुकविण्यासाठी आपली वाहने विरुद्ध दिशेने चालवीतात. यामुळे अपघातही होऊ शकतो. संरक्षक कठडा व पडलेला खड्डा या सर्व गोष्टीचा विचार करता कोणतीही जीवित हानी होऊ नये यासाठी बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष देणे गरजेचे असल्याचे वाहन चालक व ग्रामस्थांनी म्हटले आहे.