
दोडामार्ग : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, झोळंबे येथे सोमवार, दि. ४ ऑगस्ट रोजी रानभाजी प्रदर्शन आणि पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात विविध प्रकारच्या स्थानिक व औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांचे प्रदर्शन आणि त्या वापरून तयार केलेल्या चविष्ट पाककृतींची स्पर्धा भरविण्यात आली.
या कार्यक्रमात पालकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. त्यांनी विविध रानभाज्या आणून त्यांचे महत्त्व, उपयोग व पाककृतींबाबत सविस्तर माहिती दिली.तसेच बहुसंख्य पालकांनी पाककला स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपल्या पाककलेचा नमुना सादर करून विद्यार्थ्यांची मने जिंकली. सदर उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना विविध पाककृतीचा आस्वाद घेता आला. कार्यक्रमात बोलताना शिक्षक संतोष गवस यांनी रानभाज्यांचे आरोग्यासाठीचे महत्त्व आणि त्यांची सध्याच्या जीवनशैलीतील गरज अधोरेखित केली. तसेच, मुख्याध्यापक प्रवीण देसाई यांनी स्वतःचे अनुभव शेअर करत विद्यार्थ्यांना प्राकृतिक अन्नाचे महत्त्व समजावून सांगितले.
विशेष आकर्षण ठरले ते सिताबाई गवस आजींचे बालपणीचे रानभाजीसंबंधी अनुभवकथन. त्यांनी पारंपरिक पद्धतीने रानभाज्या शोधणे, त्यांचा वापर आणि गावातला जुन्या काळातील आहार सांगितला. ग्रामपंचायत सदस्या संजना गवस यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना आणि पालकांना रानभाज्या नियमित आहारात समाविष्ट करण्याचे आवाहन केले.
हा उपक्रम शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये पोषण जाणीव, स्थानिक अन्नसंस्कृतीविषयी आदर आणि आरोग्यविषयक जाणीव जागृती निर्माण करणारा ठरला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संजना गवस, मुख्याध्यापक प्रवीण देसाई, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष दीक्षा घोगळे, शिक्षक संतोष गवस, विशाल माने, दिनेश जाधव , भाग्यश्री गवस, विशाखा गवस, सीताबाई गंवस, शुभ्रा झोरे, तसेच सर्व माता पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
---