
दोडामार्ग : दोडामार्ग भोसले काॅलनी येथे घरी खेळताना एका अडीच वर्षाच्या मुलाचा जिन्याच्या रेलिंगवरून पाय घसरल्याने तो खाली पडला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. सत्यमकुमार कुंदन मेहता असे त्या मुलाचे नाव असून अधिक उपचारासाठी त्याला येथील ग्रामीण रुग्णालयातून आसिलो गोवा येथे नेताना रुग्णवाहिकेचे मागील दार उघडले अन् रुग्णासहीत त्याच्या नातेवाईकांना धडकीच भरली. यावेळी स्थानिकांनी आरडाओरडा करून दरवाजाला लावला व तो पुन्हा उघडू नये म्हणून दरवाजाला ड्रेसिंग पट्टी बांधून रुग्णाला पुढे नेले. या प्रकाराबाबत उपस्थितांनी तीव्र शब्दात नाराज ही व्यक्त केली.
दोडामार्ग भोसले कॉलनी येथे एक परप्रांतीय कुटुंब भाडे तत्वावर राहते. ते मुळ कर्नाटकचे रहिवासी आहेत. दोडामार्ग येथे मोलमजूरी करून आपला संसार चालवत होते. कुंदन हे नेहमी प्रमाणे सकाळी आपल्या साईडवर काम करण्यासाठी गेले. त्यांची बायको व अडीच वर्षाचा मुलगा सत्यमकुमार घरी म्हणजे रूमवर होते. घरी रूमवर असताना कुंदन यांची बायको काहीतरी काम करत होती. काम करत असताना बाजूला जिन्यावर रेलिंगला धरून सत्यमकुमार खेळत होता. खेळत असताना रेलिंगवरून त्याचा पाय घसरला आणि तो जिन्यावरून खाली पडला. त्यावेळी त्याचे डोके खाली जोरदार आदळले आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या एका इसमाने त्यांना आपल्या खासगी गाडीतून येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. यावेळी डॉ. अनिकेत गुरव यांनी त्याची तपासणी करून प्राथमिक उपचार केले. मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन अति रक्तस्त्राव झाला असल्याचे सांगून अधिक उपचारासाठी गोवा येथे पाठविले. १०८ नंबरची रुग्णवाहिका बोलावली. त्याला रुग्णवाहिकेत घालून रुग्णवाहिका गोव्याला जायला निघाली.
हास्पिटलमधून बाहेर मुख्य रस्त्यावर पोहोचताच रुग्णवाहिकेचे मागचे दोन्ही दरवाजे उघडले अन् आतील रुग्ण व त्याच्या नातेवाईकांचे भीतीने गाळण उडाली. त्यांनी आरडाओरडा केली. तसेच रस्त्यावरून मार्गस्थ होणाऱ्यांनी आरडा ओरड करून गाडीचा दरवाजा उघडल्याचे चालकाला सांगितले. चालकाने रुग्णवाहिका थांबविली. त्यानंतर रुग्णवाहिकेचे दरवाजे बंद केले.
रुग्णवाहिकेचा दरवाजा लागत नव्हता. यावेळी सर्वांनी दरवाजा लावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश येत नव्हते. रुग्णवाहिकेतील डॉक्टर व चालक यांनी अखेर ड्रेसिंग करण्यासाठी वापरली जाणारी कापडी पट्टी काढली व त्याने दरवाजा बांधला. हा प्रकार पाहून उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त करत डॉक्टर व चालकांना याबाबत विचारणा केली. कोलवाळ गोवा येथे आगीत भस्मसात झालेल्या रुग्णावाहिकेचे दरवाजे या रुग्णवाहिकेला लावण्यात आल्याचे उपस्थितांना समजताच त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. शिवाय अजूनही आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असल्याच्या प्रतिक्रिया देत निघून गेले.