
दोडामार्ग : झोळंबे परिसरात गेल्या काही दिवसांपासून हत्तींचा वावर वाढला असून, यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास आलेल्या हत्तीच्या कळपाने फळबागा, सौरऊर्जेचे कुंपण आणि स्प्रिंकलर पाइपलाइन उद्ध्वस्त केली. या प्रकाराने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून ते अडचणीत सापडले आहेत.
तळकट पंचक्रोशीत शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने फळबागायती फुलवल्या आहेत. यातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच येथील शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. तिलारी खोऱ्यात वावरणारे हत्ती आता या पंचक्रोशीत ठाण मांडून आहेत. या परिसरात त्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. सोमवारी रात्री सहा हत्तींचा कळप झोळंबे गावातील सदाशिव भिडे यांच्या फळबागायतीत घुसला. २७ सुपारीची झाडे, ६ माड व ५५ केळी उध्वस्त केले. तसेच शेतीच्या संरक्षणासाठी उभारलेले सौरऊर्जा कुपंन व स्प्रिंकलर पाईपलाईनचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. सदाशिव भिडे यांचे सुमारे लाखांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.