
दोडामार्ग : विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ध्येय ठरविले पाहिजे तसेच ध्येयपूर्तीसाठी ध्येयवेडे व्हा असा मौलिक सल्ला पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबईचे सचिव प्रमोद गवस यांनी दिला. सोमवारी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले, श्री. शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे या शाळेतील विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ कार्यक्रमास गवस बोलत होते.
पिकुळे विद्यालय आणि हितवर्धक मंडळ मुंबई सुवर्णमहोत्सव 22,23 मार्च रोजी दिमाखदार सोहळा संपन्न झाला. या पुढे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून मंडळाने या वर्षीच्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तसेच दोन दिवशीय सुवर्णमहोत्सव निमित्त ईशस्तवन, स्वागतगीत आणि ग्रंथदिंडीत सहभागी झालेल्या ३० विद्यार्थ्यांस चांगल्या दर्जाचा कंपास आणि दफ्तरे मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली.९५ विद्यार्थ्यांना दफ्तरे देण्यात आली. जवळपास १२० दफ्तरे मंडळाने विद्यार्थ्यांसाठी आणली होती.
यावेळी व्यासपीठावर मंडळ सचिव प्रमोद गवस, सदस्य विद्याधर धुरी, मुख्याध्यापक अशोक आबुंलकर , सिद्धीविनायक नाट्य मंडळ मालक शत्रू गवस, माजी उपाध्यक्ष सुभाष गवस, संदीप गवस, अमित गवस , पत्रकार सुहास देसाई, रत्नदीप गवस आदी उपस्थित होते. कार्यक्रम सूत्रसंचालन शिक्षिका पूर्वा गवस, प्रास्ताविक मुख्याध्यापक आंबुलकर, तर गवस यांनी आभार मानलेत.