वझरेत गटारासाठी जुने पाईप..?

Edited by: लवू परब
Published on: June 09, 2025 19:46 PM
views 360  views

दोडामार्ग : वझरे येथे रस्त्यालगत चुकीच्या पद्धतीने गटाराचे बांधकाम केले जात आहे. या कामासाठी चक्क जुने पाईप वापरले जात असून सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अधिकारी देखील याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने निकृष्ट दर्जाचे काम करत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.

वझरे येथे एक ठेकेदार रस्त्यालगत गटाराचे काम करत आहे. या कामाची बांधकाम विभागाकडून निविदा प्रक्रिया राबविली गेली असून कामास सुरुवातही झाली आहे. हे काम करत असताना ठेकेदार मनमानी करत आहे. रस्त्यालगत गटारासाठी पाईपलाईन टाकताना खोलवर खोदकाम करणे आवश्यक आहे. मात्र ठेकेदाराने वरचेवर खोदाई करून पाईपलाईन टाकली आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा योग्य निचरा होणार नाही. परिणामी ग्रामस्थांना व वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.

ठेकेदाराने काम करताना नळ योजनेचे पाईपलाईन उघड्यावर टाकले आहेत. त्याच्याकडे वारंवार चांगल्या दर्जाचे काम करण्याची मागणी केली असता आज करतो उद्या करतो असे सांगून वेळ मारून नेली. त्यामुळे पाण्याची पाईपलाईन उघड्यावर पडली असून भर पावसाळ्यात पाणी प्रश्नाला सामोरे जावे लागणार असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने निधीचा दुरुपयोग होऊ न देता योग्य पद्धतीने काम करून घेण्याची मागणी ग्रामस्थ करत आहे.