
दोडामार्ग : पिंपळेश्वर देवस्थानच्या वर्धापन दिनानिमित्त दोडामार्ग शहरात छावा या महानाट्य मध्ये राज्याभिषेकाच्या एका प्रसंगादरम्यान शिवछत्रपती संभाजी राजे यांची थेट प्रेक्षकांमधूनच एन्ट्री झाली. दस्तूर खुद्द राजांच्या या अनपेक्षित एन्ट्रीने संपूर्ण दोडामार्गवासीय अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.
दोडामार्ग शहरासियांचेआराध्य दैवत असलेल्या पिंपळेश्वर देवस्थान चा अठरावा वर्धापन दिन काल मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पिंपळेश्वर देवस्थान समितीने आयोजित केलेल्या छावा या ऐतिहासिक नाट्यप्रयोगाची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. दोडामार्ग तिलारी रोडवर या उत्सव समितीने हा भव्य नाट्यप्रयोग विशेष आसन व्यवस्थेसहित आयोजित केला होता. हे संपूर्ण नाटक संभाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेभोवती फिरत होते. नाट्यसंपदा कंपनी गोवा निर्मित या नाटकामध्ये दोडामार्ग तालुक्यातील सासोली गावचे सुपुत्र शेखर गवस यांनी संभाजी राजांची भूमिका केली होती. श्री.गवस तसेच सोयराबाई हंबीरराव.. गणोजी शिर्के.. वगैरे अन्य भूमिकांमधील कलाकारांनी उपस्थित प्रेक्षकांची वाहवा मिळविली. मात्र राज्याभिषेक प्रसंगावेळी संभाजी महाराजांनी थेट प्रेक्षकांमधूनच सिंहासनाच्या दिशेने प्रयाण करताच उपस्थित सर्व प्रेक्षक अक्षरशः अचंबित झाले. अनेकांच्या मोबाईल मध्ये राजे संभाजी व त्यांची एन्ट्री कैद झाली. राज्याभिषेक सोहळा वेळी पिंपळेश्वर देवस्थान समितीने केलेली फटाक्यांची आतिषबाजी अक्षरशः डोळे दिपवणारी होती. शहरातील पिंपळपान या महिला ग्रुप मधील काही महिला कलाकार देखील या महानाट्य मध्ये सहभागी झाल्या होत्या.