
दोडामार्ग : तिलारी धरण पाणलोट क्षेत्रालगतच्या शिरंगे गावातील गौण खाणी कायमस्वरूपी बंद करा, या मागणीसाठी खानयाळे ग्रामस्थांनी गुरुवारपासून सुरु केलेलं साखळी उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. सायंकाळी उशिरा आमदार दीपक केसरकर उपोषण स्थळी भेट देणार असं वृत्त आहे. शिरंगे या जुन्या गावी तिलारी धरणाला लागुन काळया दगडाचे गौण खनिज उत्खनन केलं जात. या ठिकाणी चार ते ५ खाणी सुरु असून त्याचा त्रास खानयाळे ग्रामस्थांना होतो, भविष्यात त्याचा धरणाला धोका आहे असा आरोप करत त्या खाणी बंद कराव्यात अशी मागणी खानयाळे ग्रामस्थांनी महसूल प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली. मात्र प्रशासनाने या निवेदनाची दखल न घेतल्याने शिरंगे येथील शीव परिसरात गुरुवारी सकाळपासून ग्रामस्थांनी साखळी उपोषणास सुरुवात केली. या उपोषणात महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. गुरूवारी सायंकाळी महसूलच्या अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र या खाणी कायमस्वरूपी बंद करा या मागणीवर उपोषणकर्ते ठाम राहिल्याने ते उपोषण शनिवारी तिसऱ्या दिवशीही सुरू होते.
दरम्यान, तिसऱ्या दिवशी तिलारी शीर्षकामे उपविभागाचे २०२१ मधील एक पत्र व्हायरल झाले आणि तालुक्यात वेगळ्याच चर्चांना उधाण आले. हे पत्र तत्कालीन सहाय्यक अभियंता प्र.स. मुदगल यांनी तिलारी पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांना पाठवले होते. आणि त्यात तिलारी धरण परिसर राखीव वनसंवर्धन क्षेत्र घोषित केला आहे असा उल्लेख आहे. या पत्रामुळे उपोषणकर्ते अधिकच आक्रमक झाले. राखीव वनसंवर्धन क्षेत्र असेल तर तेथे खाणींना परवानगी देता येते का? आणि प्रकल्प अधिकारी जर या क्वारीत होणाऱ्या उत्तखंनंन व सुरुंग स्फोटमुळे धरणास धोका आहे तरी शासन गप्प कां? असा सवाल उपोषणकर्ते उपस्थित करत आहेत.
तिलारी मुख्य माती धरणाच्या डाव्या बाजूस सर्वे नं. ४२/१ व ४२/२ मध्ये होत असलेले उत्खनन हे मुख्य माती धरणाच्या पायथ्यापासून १०० मी. अंतराच्या आत आहे. परिणामी खाणीच्या स्फोटांमुळे कंपने तयार होवून धरणास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच शिरंगे हद्दीत स.नं.७०/२, ६३/२, ६७/१ तसेच इतर भागात देखील धरणाच्या महत्तम पाणी पातळीच्या वर अंदाजे २ मी. च्या अंतरावर काळ्या दगडाच्या खाणी आहेत. या खाणीतील स्फोटांमुळे तयार होणाऱ्या कंपनांमुळे धरणास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच तिलारी धरण परीसर हा राखीव वनसंवर्धन क्षेत्र घोषित झाला आहे. त्यामुळे या धरण परीसरात उत्खननास बंदी असण्याची दाट शक्यता आहे. या उत्खननामुळे मोठ्या प्रमाणात सुरुंग स्फोटाने काळ्या दगडाचे उत्खनन होत असून त्यामुळे घरास होणाऱ्या संभाव्य धोक्यामुळे धरण परीसरातील सर्व दगडखाणी बंद करण्याबाबत महसूल विभागास व खनिकर्म विभागास कळविण्यात यावे अशी मागणी या पत्राद्वारे प्र.स. मुदगल यांनी ४ जानेवारी २०२१ रोजी कार्यकारी अभियंता यांना दिले होते.