
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील एक बडा पदाधिकारी कमळ दूर करून लवकरच शिवबंधन हाती बांधणार असल्याची जोरदार चर्चा येथील राजकीय वर्तुळात रंगली आहे. विधानसभा निवडणूक पार पडताच पक्षीय राजकारणापासून काहीसा अलिप्त असलेल्या व सर्वसामान्यांशी नाळ जोडलेल्या या पदाधिकाऱ्याभोवती शिंदे शिवसेनेने गळ टाकण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे या पदाधिकाऱ्याने शिंदे शिवसेनेत प्रवेश केल्यास या पक्षाचे जिल्ह्यातील बळ अधिकच वाढणार असल्याचे जोरदार चर्चिले जात आहे.
जिल्ह्यातील मोठमोठी पदे भूषविलेल्या तालुक्यातील एका बड्या पदाधिकाऱ्याने ऐन विधानसभा निवडणूकीत आपल्या पक्षापासून फारकत घेऊन विरोधी पक्षातील उमेदवाराला सहकार्य केले होते. निवडणुकीमध्ये प्रचार, तसेच सभांच्या दरम्यान हा पदाधिकारी सावंतवाडी मतदार संघात फिरताना दिसला होता. त्यामुळे भाजपामधील एका बड्या नेत्याने आपल्या स्टाईलमध्ये या पदाधिकाऱ्याला चांगलाच डोस दिला होता. पक्ष संघटनेत तसेच आजवरच्या राजकीय कारकीर्दीत आणि वैयक्तिक स्तरावरही अनेक पदे भूषविलेल्या या पदाधिकाऱ्याने तेव्हापासून राजकारणापासून काहीसे लांब राहणे पसंत केले होते. मात्र अलीकडेच उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संजय पडते यांचा तसेच अन्य ठिकाणी होत असलेले प्रवेश पाहता दोडामार्ग मधील या पदाधिकाऱ्याभोवतीही शिंदे सेनेने गळ टाकला आहे. दरम्यान या पदाधिकाऱ्याच्या कार्यकर्त्यांनी भाजपा सोडण्यासंदर्भात पुन्हा एकदा विचार करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे वृत्त आहे.
अन्यथा धनुष्यबाण हाती घेणार?
भाजपातून जिल्ह्यातील वरिष्ठ स्थानिक संस्थावर मोठ्या पदासह अन्य बऱ्याच पदांवर काम केलेल्या या पदाधिकाऱ्याला पुन्हा पक्षात सामावून घेण्यात यावे यावर भाजपातील काहींचे मत आहे. तर थेट वरिष्ठ पातळीवरच काहीजणांकडून या पदाधिकाऱ्याच्या पुनरागमनाला थेट विरोध होत असल्याचे बोलले जात आहे. ऐन विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षाला जाऊन मिळालेल्या या पदाधिकाऱ्याला पक्ष संघटनेत सामावून घेण्यासंदर्भात दोन भिन्न मतप्रवाह झाल्याच्या चर्चा आहेत. शिंदे शिवसेनेने जरी या पदाधिकाऱ्याच्या भोवती गळ टाकण्यास सुरुवात केली असली तरी खुद्द या पदाधिकाऱ्याच्या मनात मात्र आपल्या बड्या नेत्याच्या छत्रछायेखाली जाण्याची इच्छा असल्याचे खुद्द तो पदाधिकारी आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवत आहे. मात्र, वरिष्ठांनी याकडे दुर्लक्ष केल्यास हा बडा पदाधिकारी धनुष्यबाण हाती घेतल्याशिवाय राहणार नसल्याचे बोलले जात आहे.
कोणता झेंडा घेऊ हाती?
आगामी काळात जि.प. व पं.स. निवडणुका पार पडणार आहेत. त्यावेळी प्रत्येक पक्ष मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात करतो. दोडामार्ग तालुक्यातील अनेक आंदोलने, उपोषणे प्रसंगी आवर्जून उपस्थिती लावणाऱ्या व सर्वच पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी थेट संबंध असणाऱ्या या बड्या पदाधिकाऱ्याला आपल्या गळाला लावण्यास अनेक राजकीय पक्ष इच्छुक आहेत. मात्र हाती कमळ ठेवावे की धनुष्यबाण धरावे? अशी अवस्था या पदाधिकाऱ्याची झाली असून आगामी जि. प. ; पं. स. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पक्षांतराच्या घडामोडी पहावयास मिळणार असल्याचेही बोलले जात आहे.
कमळ आणि धनुषबाण फोटो लावा