हत्तींचा मोर्चा मोर्लेकडे..!

Edited by:
Published on: December 29, 2024 19:51 PM
views 161  views

दोडामार्ग : तिलारी खोऱ्यातील हेवाळे येथे अलीकडे आढळून आलेल्या रानटी हत्तीने काल मोर्ले येथे आपला मोर्चा वळविला. तेथील नारळ, केळी, यांसह अनेक झाडांची लाखो रुपयांची नुकसानी या हत्तीने केली. नजीकच्या गावातून दाखल झालेल्या या हत्तीची दहशत मोर्ले तसेच आसपासच्या गावात पसरली आहे. 

गेल्या आठवड्यात दोडामार्ग - विजघर मार्गावर असलेल्या हेवाळे येथे राममंदिर नजीकच्या नदी पात्रालगत टस्कर हत्ती आढळून आळा होता. या हत्तीच्या संचारामुळे हेवाळे तसेच आसपासच्या गावातील शेतकरी, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काल शनिवारी मोर्ले गावात हा हत्ती दाखल झाला. व त्याने गावातील अनेक नारळ केळीची झाडे यांचा फडशा पाडत लाखो रुपयांची नुकसानी केली. मोर्लेतील चंद्रकांत बर्डे, सुरेश गवस आदींची मोठी नुकसानी या हत्तीने केली. दरम्यान नजीकच्या हेवाळे गावातून आलेल्या या हत्तीची मोर्ले, पाळये, केर, सोनावल आदी गावांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.