
दोडामार्ग : दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात अपुरा डॉक्टर वर्ग व औषधांचा तुटवडा या गोष्टींवरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगला आहे. यातच शनिवारी दोडामार्ग दौऱ्यावर आलेले दौऱ्यावर आलेले जिल्ह्याचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष इंगळे यांनी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाला आवश्यक औषध साठा पुरवला असल्याची माहिती दिली आहे. तर येत्या आठवड्यात रुग्णवाहिकेवरील चालक व आठवड्यात किमान एक दिवस स्त्रीरोग व बालरोग तज्ञ नियुक्त करण्यात येतील अशी माहिती दिली आहे. तर विरोधक बाबुराव धुरी यांनी यासाठी प्रशासनाला फक्त 10 दिवसांचा अल्टिमेटम देत. कारभार सुधारा अन्यथा जन आक्रोश आंदोलनाला सामोरे जा असा इशारा दिला आहे.
दरम्यान तत्पूर्वी आयुष्यमान भारत कार्यक्रमासाठी दोडामार्ग येथे आलेल्या डॉ. सुभाष इंगळे यांच्याशी शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस व ठाकरे सेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांनी संयुक्त चर्चा केली. यावेळी गणेशप्रसाद गवस यांनी वस्तुस्थिती सांगा. उगाच दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाची बदनामी नको असा मुद्दा मांडला. तर बाबुराव धुरी यांनी आम्हाला जनतेच्या आरोग्याशी मतलब आहे. जर सेवा मिळत नसेल आणि कुणाची बदनामी होत असेल तरी पण आम्ही गप्प बसणार नाही अशी भूमिका मांडली. यावेळी दोडामार्ग मधील 102 रुग्णवाहिका करीता नसलेला चालक, स्त्रीरोगतज्ञ, बालरोग तज्ञ हे रुग्णालयाला मिळाले पाहिजेत, रुग्णालय स्वच्छता प्रश्न मार्गी लागला पाहिजे आणि कर्मचारी यांचे पगार झाले पाहिजेत असे मुद्दे मांडण्यात आले. यावर डॉ. इंगळे यांनी आपण तातडीने रुग्णवाहिका चालकाचा प्रश्न मार्गी लावत असून आवश्यक औषध पुरवठा सुद्धा उपलब्ध असल्याची माहिती दिली. तसेच आठवड्यातून एकदा तज्ञ डॉक्टर इथे उपलब्ध केले जातील व स्वच्छता बाबत येत्या काही दिवसात स्वतंत्र तीन कर्मचारी नियुक्त होतील अशी माहिती दिली आहे.
मात्र नेमक बाबूराव धुरी यांनी त्यांना आपल्याला इथला सावळा गोंधळ दहा दिवसात संपला पाहिजे असा अल्टिमेटम दिला आहे. तर गणेशप्रसाद गवस यांनी सरकार आणि या भागाचे आमदार हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र राज्यातच कर्मचारी आणि डॉक्टर कमतरता असल्याने काहीशी अडचण होत आहे. मात्र इथला कोणताही रूग्ण उपचाराशिवाय परत जाणार नाही याचीही काळजी प्रशासनाने पुरेपूर घेतल्याचे स्पष्ट करत प्रशासनाला सहकार्य करा नाहक बदनामी योग्य नाही अशी भूमिका मांडली आहे.