
दोडामार्ग : नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सव काळात संपूर्ण दोडामार्ग शहरात, विशेषतः बाजारपेठ परिसरात पोलिसांनी केलेल्या काटेकोर वाहतूक नियोजनाचे नागरिक व व्यापाऱ्यांनी कौतुक केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील दोडामार्ग ही बाजारपेठ केवळ तालुक्यातीलच नव्हे तर सीमेलगतच्या गोव्याच्या डिचोली व बारदेस तालुक्यातील ग्राहकांसाठीही महत्त्वाची मानली जाते. चतुर्थीच्या पंधरवडाभर आधीपासूनच येथे खरेदीसाठी ग्राहक, व्यापारी व फिरते विक्रेते मोठ्या संख्येने गर्दी करतात. त्यामुळे चारही राज्य मार्गांवरील वाढत्या दुकानांमुळे व वाहतुकीच्या वाढत्या दाबामुळे ट्रॅफिक जॅमची समस्या उद्भवते.
यंदा मात्र पोलिसांनी चतुर्थीपूर्वीपासूनच गोवा रोडसह महत्त्वाच्या मार्गांवर वाहतुकीचे सुयोग्य नियोजन केले. त्यामुळे संपूर्ण उत्सव काळात गर्दी असूनही कुठेही ट्रॅफिक जॅमची समस्या निर्माण झाली नाही.
या पार्श्वभूमीवर नागरिक व व्यापाऱ्यांनी पोलिस निरीक्षक हेमचंद खोपडे यांची भेट घेऊन दोडामार्ग पोलिस व होमगार्ड यांच्या कार्याचे विशेष अभिनंदन केले.
यावेळी दोडामार्ग तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष सागर शिरसाट, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक संतोष नानचे, व्यापारी पांडुरंग बोर्डेकर, शामसुंदर चांदेलकर, सुदेश मळीक, प्रकाश काळबेकर, शुभम पांचाळ, फोंडू हडीकर, ओंकार पेडणेकर, सिद्धू कासार, वैभव इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.