बहुप्रतिक्षित दोडामार्ग पं.स.च्या नूतन इमारतीचं शनिवारी भूमिपूजन

केंद्रीयमंत्री राणे यांच्या उपस्थितीत पालकमंत्री चव्हाण - मंत्री दीपक केसरकरांच्या हस्ते होणार भूमिपूजन
Edited by: संदीप देसाई
Published on: December 07, 2023 15:46 PM
views 101  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुका पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन शनिवारी ९ डिसेंबरला माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे हस्ते होणार आहे. या या भूमिपूजनामुळे पंचायत समितीची सुसज्ज इमारत लवकरच मार्गी लागणार असल्याने भाड्याच्या इमारतीतून हाकला जाणारा पंचायत समितीचा कारभार हक्काचा इमारतीतून हाकला जाणार असून त्याचा दोडामार्ग मधील जनतेला मोठा फायदा होणार आहे.

   गेल्या कित्येक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या दोडामार्ग पंचायत समितीच्या नियोजित नवीन इमारतीचे काम अखेर मार्गी लागले आहे. तब्बल 4 कोटी 99 लाख रुपये एवढा निधी मंजूर झालेले हे काम कार्यारंभ आदेश मिळाल्याने सिंधुदुर्ग जि. प. च्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात आले आहे.  पंचायत समितीच्या या नुतन  इमारतीचे भूमिपूजन येत्या 9 डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंत्री रवींद्र चव्हाण व दीपक केसरकर यांचा खासदार विनायक राऊत, आमदार निरंजन डावखरे, अनिल तटकरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, नितेश राणे, वैभव नाईक, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रचित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उपविभागीय अधिकारी प्रशांत पानवेकर, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, कार्यकारी अभियंता संतोष सावर्डेकर, पोलीस उपअधीक्षक संध्या गावडे, तहसीलदार संकेत यमगर, पोलीस निरीक्षक अरुण पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या भूमिपूजन सोहळ्यास नागरिक व मान्यवरांनी उपस्थित राहावे असे आवाहन गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी धनंजय ठाकरे,  सहाय्यक गटविकास अधिकारी निलेश जाधव, बांधकामाचे शाखा अभियंता अमित कल्याणकर यांनी केलं आहे.

   मुख्य बाजारपेठमध्ये भेडशी रोडवरील महालक्ष्मी इमारतीमध्ये सध्या पंचायत समितीचे कार्यालय खाजगी जागेत सुरू आहे. आता या पंचायत समितीची स्वतःची नवीन इमारत होत राज्य शासनाने या नियोजित इमारतीसाठी मंजूर केलेल्या एकूण 4 कोटी 99 लाख रु. निधी पैकी इमारत बांधकामासाठी 3 कोटी 80 लाख रुपये निधी वापरण्यात येईल तर आतील फर्निचर व इतर कामासाठी उर्वरित 1 कोटी 19 लाख रुपये निधी वापरला जाणार आहे. या इमारतीच्या बेसमेंटला पार्किंगची सुविधा तर तळमजल्यावर गटविकास अधिकारी व अन्य खातेप्रमुख यांची कार्यालये शिवाय दोन गोडावून असणार आहेत. तर पहिल्या मजल्यावर  सभापती, उपसभापती यांची कार्यालये व सुसज्ज सभागृह देखील आराखड्यात समाविष्ट करण्यात आल आहे.