
दोडामार्ग : झरेबांबर येथे टाटा टेम्पो व अशोक लेलँड ट्रक या दोन मालवाहू वाहनांची समोरासमोर धडक बसून अपघात झाला आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र टाटा टेम्पोच्या दर्शनी भागाचा चुराडा झाला असून ट्रकाच्या दर्शनी भागाचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. गुरुवारी दुपारी ३.१५ वा.च्या सुमारास हा अपघात झाला.
टाटा २०७ मालवाहू टेम्पो साटेली भेडशीहून दोडामार्गच्या दिशेने जात होती. तर बेळगाव ते गोवा अशी दररोज मालवाहतूक करणारा अशोक लेलँड कंपनीचा ट्रक दोडामार्गहून बेळगावच्या दिशेने जात होता. दोडामार्ग-विझघर राज्य मार्गावरील झरेबांबर येथे ही दोन्ही वाहने समोरासमोर आली असता त्यांची समोरासमोर धडक बसून अपघात झाला. अपघातानंतर मोठा आवाज झाला. कसला आवाज झाला हे पाहण्यासाठी लगतच्या ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली. ही धडक इतकी जबर होती की टेम्पोचे पुढील चाक एक्सेलपासून निखळून आले. तसेच केबिन पूर्णतः चेपून काच फुटली. परिणामी चालक केबिनमध्ये अडकून पडला. उपस्थित ग्रामस्थांनी चालकास बाहेर काढले. चालकाच्या खांद्याला मुका मार लागला. ट्रकचा काही दर्शनी भाग चेपला. यात समोरील चालकाच्या बाजूची लाईटदेखील फुटली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.