
दोडामार्ग : दोडामार्ग ते वीजघर या राज्य मार्गावर सुरू असलेल्या काँक्रीटीकरणाच्या कामामुळे रविवारी पुन्हा एकदा प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचा फटका सर्वसामान्यांना बसला. रविवारी लग्नाचा मुहूर्त असल्याने तालुक्यात विविध ठिकाणी विवाहसोहळ्यांची रेलचेल असताना, याच दिवशी वाहतूक कोंडीने अक्षरशः कहर केला. झरेबांबर येथे तर नवरदेवालाच स्वतःच्या लग्नासाठी पायी चालत मंडप गाठावा लागल्याची संतापजनक घटना घडली. रस्त्याच्या कामामुळे एका बाजूने वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती; मात्र दुसऱ्या बाजूला योग्य आणि पुरेशा रुंदीचा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला नव्हता. परिणामी, वाहनांची लांबलचक रांग लागून प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. लग्नासाठी निघालेल्या वरपक्षाची गाडीही या कोंडीत अडकली आणि अखेर त्याला पायी चालत जाण्याचा निर्णय घ्यावा लागला.
दोडामार्ग ते वीजगशघर राज्यमार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या मार्गावर सूचनाफलक नसल्याने वारंवार अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, रस्त्यालगत असलेल्या ग्रामपंचायतीच्या अनेक सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदारासोबत बैठक लावण्याची मागणी वारंवार केली. मात्र या मागणीकडे प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केले. सध्या काँक्रीट करण्याचे काम संथ गतीने सुरू असून रस्त्याच्या रुंदीकरणाला अडथळा ठरणारी धोकादायक झाडे न हटवताच सुरू आहे.
झरेबांबर-विमानतळ येथे रस्त्याच्या एका बाजूचे काँक्रीट करण्याचे काम पूर्ण झाले व ठेकेदाराने दुसऱ्या बाजूचे काम हाती घेतले. मात्र धोकादायक झाडे न हटवल्याने रस्ता अरुंद पडला आणि या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ लागली. रविवारी अशीच वाहतूक कोंडी झाल्याने चक्क नवरदेवाला पायी चालत लग्नाचा मंडप गाठण्याची वेळ आली. नवरदेव झरेबांबर येथील एका मंगल कार्यालयात यायला निघाला आणि या कार्यालयापासून पाचशे मीटर अंतरावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या. काही केल्या वाहतूक कमी होत नसल्याचे लक्षात येताच व लग्नाची मुहूर्तवेळ हातातून निसटत असल्याचे लक्षात येताच नवरदेवाने शेवटी वाहन सोडून पायी चालत मंडपाकडे कूच केली. पारंपरिक वेशात, लग्नाच्या घाईत आणि कुटुंबीयांच्या चिंतेतून हा प्रवास त्याला करावा लागला. या प्रकारामुळे वरपक्षासह उपस्थित नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
स्थानिकांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, काम सुरू ठेवताना वाहतुकीचे नियोजन का केले नाही? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. केवळ काम सुरू करणे पुरेसे नसून नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था करणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे मत व्यक्त होत आहे. ही घटना म्हणजे केवळ एका नवरदेवाची गैरसोय नसून, नियोजनाच्या अभावामुळे सर्वसामान्यांना रोज सहन करावा लागणाऱ्या समस्यांचे जिवंत उदाहरण असल्याचे बोलले जात आहे. आता तरी झोपी गेलेल्या प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.










