दोडामार्गात १७ मे रोजी सांस्कृतिक लोककला महोत्सव

सांस्कृतिक लोककला मंच, दोडामार्गचे आयोजन | उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान व सत्कार | शेकडो कलाकारांचा सहभाग अपेक्षित
Edited by: संदीप देसाई
Published on: April 19, 2026 20:06 PM
views 33  views

दोडामार्ग : सांस्कृतिक लोककला मंच, दोडामार्गच्या वतीने रविवार, १७ मे २०२६ रोजी सरगवे पुनर्वसन येथील श्री देव खंडोबा सभागृहात ‘सांस्कृतिक लोककला महोत्सव २०२६’ (तृतीय वर्ष) आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार असून, दोडामार्ग तालुक्यातील कलाकारांच्या एकजुटीचे प्रतीक म्हणून हा महोत्सव साजरा केला जाणार आहे. या महोत्सवात विविध लोककला प्रकार सादर होणार असून शेकडो कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे, अशी माहिती मंचाचे अध्यक्ष शंकर जाधव यांनी दिली.

राज्यातील पारंपरिक व सांस्कृतिक कलांचा प्रसार, जतन व संवर्धन व्हावे यासाठी सांस्कृतिक लोककला मंच सातत्याने कार्यरत आहे. ग्रामीण भागातील फुगडी, समई नृत्य, वासुदेव, भजन, दशावतार, दिंडी, सनई-तुतारी वादन, लावणी, कीर्तन, लेझिम, टिपरी, कळसूत्री बाहुली, कोळी नृत्य, घुमट वादन, तमाशा, वाघखेळ, मिमिक्री, ओवी आदी लोककला प्रकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा या महोत्सवाचा उद्देश आहे. या वेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये

तुळशीदास दत्ताराम नाईक, तेजस तुकाराम देसाई, लक्ष्मण बाळा नाईक, अ‍ॅड. सोनू आत्माराम गवस, सदाशिव दादा पाटगावकर, डॉ. जगदीश पाटील, अर्जुन रामा पारधी, विठ्ठल म्हावळणकर, डॉ. सुरज गावकर, डॉ. ओंकार कविटकर, विष्णू सुतार, गोकुळदास तोरसकर, वासुदेव गायचोर, विजय डेगवेकर आदींचा समावेश आहे.

संयुक्त दशावतार नाट्य प्रयोग

दोडामार्ग तालुक्यातील नामवंत कलाकारांचा संयुक्त दशावतार नाट्य प्रयोग महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार असून, सहभागी कलाकारांचा यावेळी सन्मानही करण्यात येणार आहे.

महिला कर्तृत्व सन्मान सोहळा

बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण साधणाऱ्या व सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या महिलांचा विशेष सन्मान या महोत्सवात करण्यात येणार आहे.