
दोडामार्ग : मागील वर्षापासून *वत्सला प्रतिष्ठान* मातोश्री द्रोपदी कुंभार लोककला संशोधन व लोककला जतन यासाठी पुरस्कार देत आहे. कष्टकरी व कृषी संस्कृतीशी निगडित लोककला झपाट्याने लोप पावत आहेत. या लोककला टिकवणे, त्यांचे संवर्धन करणे व पुढील पिढीकडे या लोककला हस्तांतरित करणे, याकरिता प्रोत्साहन व प्रेरणा म्हणून वत्सला प्रतिष्ठान, कणकवली कडून लोककला क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार देण्यात येतात. नुकतेच हे पुरस्कार प्रतिष्ठानकडून जाहीर झाले असून वर्ष 2025 26 करिता कुडाळ, सिंधुदुर्ग येथील लोकसाहित्य अभ्यासक व संशोधक *मोहन रणसिंग* यांना संशोधनाचा , तर लोककला जतनासाठीचा पुरस्कार शिवदास कुमार मसगे यांना जाहीर करण्यात आले आहेत. ही माहिती वत्सला प्रतिष्ठानचे कार्यवाह प्रा. मोहन कुंभार यांनी दिली आहे.
वत्सला प्रतिष्ठानचा पहिला 2024- 25 चा लोकसाहित्य संशोधन पुरस्कार गोव्यातील लोककला अभ्यासक व संशोधिका *प्रा. पौर्णिमा राजेंद्र केरकर* यांना देण्यात आला होता. गोवा आणि महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकरी व कष्टकरी यांच्याशी निगडित अनेक लोककला आणि लोकगीतांचे संशोधन पौर्णिमा केरकर यांनी केले आहे. लोकगीतामध्ये जतनाचा पुरस्कार कणकवली, वरवडे येथील *श्रीमती मालती मेस्त्री* यांना देण्यात आला होता. मालती मेस्त्री यांना विविध विधीसाठी गायिली जाणारी लोकगीते मुखोद्गत आहेत. परिसरात त्या यासाठी प्रसिद्ध आहेत.
यावर्षीचा, २०२५-२६ चा लोकसाहित्य अभ्यास व संशोधनाचा मातोश्री द्रोपदी कुंभार पुरस्कार कुडाळ, सिंधुदुर्ग येथील *मोहन रणसिंग* यांना जाहीर करण्यात आला आहे. *सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदिवासी ठाकर* या पुस्तकात समाविष्ट ठाकर समाजातील लोककला संशोधन अनुषंगाने विचार करून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. *मोहन रणसिंग* हे मुंबई महानगरपालिकेचे निवृत्त अधिकारी आहेत. १९७७ पासून ते *ठाकर लोककला* व *ठाकर बोली* वर संशोधन करत आहेत. भारतीय भाषा अभ्यासक *गणेश देवी* संपादित *"भारतीय लोकभाषांचे सर्वेक्षण"* मध्ये ठाकर बोलीवर केलेल्या लेखनासाठी मोहन रणसिंग यांचे संशोधन महत्त्वाचे ठरले आहे. मोहन रणसिंग यांनी मुंबई सकाळ, नवशक्ती, सामना अशा वृत्तपत्रासाठी काही काळ पुस्तक परीक्षणे लिहिली आहेत. *मोहन रणसिंग* यांचे लोककला संशोधनात्मक काम महत्त्वाचे असून त्यांनी कादंबरी, कविता, लोकगीते, आत्मचरित्र , समाज संशोधन अशा अंगाने मराठी साहित्य लेखन केले आहे. समकालातील ते एक महत्त्वाचे साहित्यिक आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजातील लोककला विस्मृतीच्या उंबरठ्यावर असताना त्यांनी हे महत्त्वाचे संशोधन केले आहे. पुस्तक रूपाने हे संशोधन पुढील काळामध्ये अभ्यासकांना महत्वाचे ठरेल. *सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदिवासी: ठाकर* या त्यांच्या पुस्तकांस महाराष्ट्र फाउंडेशन व गोरे बंधू ट्रस्टचे अनुदान प्राप्त झाले आहे.
वत्सला प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा लोककला क्षेत्रातील *लोककला जतनाचा* मातोश्री द्रोपदी लोककला पुरस्कार कुडाळ, सिंधुदुर्ग येथीलच शिवदास कुमार गणपत मसगे यांना जाहीर करण्यात येत आहे. शिवदास मसगे हे एम.ए., बी.एड., बी.पी.एड. असे उच्चशिक्षित असून नेरूर कलेश्वर विद्यामंदिर येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते लोककलाकार असून चित्रकथी, कळसूत्री व चामड्याच्या बाहुल्या तयार करणे व चित्रकथी कळसुत्री बाहुल्यांचा खेळामध्ये त्यांचा हातखंडा आहे.
ठाकर आदिवासी पारंपरिक लोककलांचे जतन, संवर्धन व लोककला सादरीकरण ते करतात. होतकरू व आवड असणाऱ्या तरुणांना ते या लोककलांचे प्रशिक्षण देतात. पारंपरिक लोककलांचा प्रसार , प्रचार व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. लोककलेद्वारे जनजागृती व परंपरा जपण्याचे महत्वाचे कार्य ते करतात. लोककला संवर्धनासाठी
पिंगुळी येथे ठाकरवाडी म्युझियम निर्मितीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. पारंपरिक ठाकर लोककलेचे जतन, प्रदर्शन व अभ्यासासाठी व्यासपीठ निर्माण करून पुढील पिढीपर्यंत लोककला पोहोचवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न ते करतात. मसगे यांना कौटुंबिक कलात्मक परंपरा असून वडील श्री गणपत सखाराम मसगे व बंधू कृष्णा मसगे हेही लोककला जोपासत आहेत.
ठाकर आदिवासी पारंपरिक लोककलांना उर्जित अवस्था देऊन त्यांचा प्रसार व संवर्धन करणे व पुढील पिढीपर्यंत ही परंपरा पोहोचवणे हे त्यांच्यासमोर प्रमुख उद्दिष्ट आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा ग्रामीण लोककलांचा एक महत्त्वाचा जिल्हा आहे. महाराष्ट्रबरोबरच या जिल्ह्यातील बऱ्याच लोककला काळाच्या ओघात लोप पावत आहेत. या काळात लोककला संशोधन आणि या लोककला जतनासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्यासाठी *वत्सला प्रतिष्ठान* मार्फत दरवर्षी तज्ज्ञ निवड समितीच्या मार्गदर्शनाखाली या पुरस्कारार्थींची निवड करण्यात येते.
वरील दोन्ही पुरस्कारांच्या निवड समितीतील साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त प्रा. प्रवीण बांदेकर, प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर, प्रसिद्ध साहित्यिक वीरधवल परब, रश्मी कशेळकर, प्रा.विजय ठाकर, प्रसिद्ध चित्रकार नामानंद मोडक, साहित्यिका कल्पना मलये व सामाजिक, सांस्कृतिक कार्यकर्ते विनायक सापळे* यांच्या निवड समितीने या पुरस्कारार्थींची निवड केली आहे. रोख रक्कम, शाल व सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप असून वत्सला प्रतिष्ठानच्या वर्धापनदिनी होणाऱ्या सोहळ्यामध्ये हे पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते सन्मानाने प्रदान करण्यात येतील, असे अध्यक्ष संगीता कुंभार व कार्यवाह *मोहन कुंभार* यांनी जाहीर केले आहे. यावेळी लोककला जतन पुरस्कार प्राप्त शिवदास मसगे हे चित्रकथी सादरीकरण करणार आहेत.












