
दोडामार्ग : “राष्ट्रीय सेवा योजनेची शिबिरे ही केवळ श्रमदानाची केंद्रे नसून ती संस्कारांची शाळा आहेत. ग्रामीण भागातील समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतल्यासच खऱ्या अर्थाने ग्रामविकास साध्य होईल.” असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले. लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागामार्फत भिकेकोनाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या सात दिवसीय निवासी शिबिराच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी व्यासपीठावर त्याचे समवेत शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत, महाविद्यालय विकास समिती सदस्य हेमंत पेडणेकर, सुरेश गवस, निलेश सावंत, सूर्यकांत गवस, लक्ष्मण आयनोडकर, विजय जाधव तसेच भिकेकोनाळ गावचे पोलीस पाटील शुभम धुरी व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय खडपकर, सह कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रथमेश ठाकूर उपस्थित होते. भिकेकोनाळ गावात सात दिवशीय निवासी शिबिरात विद्यार्थ्यांनी विविध विधायक उपक्रम राबविले.
त्यात गावातील रस्ते व सार्वजनिक परिसराची स्वच्छता, पथनाट्यांच्या माध्यमातून व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश, शोषखड्डे व बंधारे निर्मितीसाठी श्रमदान या उपक्रमांचा समावेश होता. यावेळी सावंत यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत ग्रामीण अर्थव्यवस्थेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. सावंत यांनी, “भिकेकोनाळसारख्या ग्रामीण भागात येऊन विद्यार्थ्यांनी घेतलेले श्रमसंस्कार त्यांच्या पुढील आयुष्यात नक्कीच उपयोगी ठरतील. ग्रामस्थांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळेच हे शिबिर यशस्वी झालेचे नमूद केले.”
यावेळी कु. नरेश गवस, कु. चंद्रकांत गवस व कु. वैष्णवी कदम यांनी सात दिवसांच्या वास्तव्यातील अनुभव कथन केले. तसेच ग्रामस्थ विठ्ठल रमेश गवस यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. संजय खडपकर यांनी केलं. सूत्रसंचालन कु. तनया मणेरीकर व आभार कु. चंद्रकांत गवस यांनी मानले.










