कळणेत परवानगीशिवाय विद्युत खांब उभारणी

वृक्षतोडीवर रोक | वनविभागाचा पंचनामा ; दंडात्मक कारवाईची शक्यता
Edited by:
Published on: November 30, 2025 16:26 PM
views 50  views

दोडामार्ग : कळणे परिसरात रस्त्यालगत विद्युत खांब उभारणीच्या कामासाठी इको सेन्सिटिव्ह झोन असतानाही ठेकेदाराने वनविभागाची तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाची कोणतीही परवानगी न घेता काम सुरू केल्याचे आढळून आले. यावेळी झाडांची विनापरवाना तोड चालू असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सावंतवाडी विधानसभा उपाध्यक्ष रविकिरण गवस यांना मिळताच त्यांनी याबाबत वनविभागाशी संपर्क साधला. यानंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व परवानगी नसतानाही झाडतोड झाल्याने संबंधित झाडांची मोजणी करण्यात आली. पंचनामा करून संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

यावेळी माध्यमांशी बोलताना उपाध्यक्ष रविकिरण गवस म्हणाले, “येथील स्थानिक शेतकऱ्यांनी झाडतोड केली तर त्यांच्यावर त्वरित कारवाई केली जाते. पण बाहेरील ठेकेदारांकडून नियमबाह्य पद्धतीने कामे केली जात आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने योग्य ती कडक कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी केली. घटनास्थळी वीज विभागाचे अधिकारी नायर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता संभाजी घंटे, मणेरी वनरक्षक शैलेश कांबळे, वनरक्षक तसेच अतिरिक्त वनपाल उमेश राणे आणि वनसेवक विश्राम कुबल उपस्थित होते.