
दोडामार्ग : समाजातील महिला, शेतकरी, शिक्षण आणि शोषित-वंचित घटकांच्या उन्नतीसाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेतलेल्या महात्मा जोतीराव फुले यांनी समाज परिवर्तनाची अद्वितीय कामगिरी केली. रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधणे, शिवचरित्राचा पहिला पोवाडा लिहिणे, विधवा स्त्रियांची अवस्था सुधारण्यासाठी क्रांतिकारी काम करणे ही त्यांची इतिहासातील मोठी देणगी आहे.
त्याकाळी विधवांवर होणारा मानसिक व सामाजिक छळ पाहून त्यांनी अनेक महिलांना आश्रय दिला, त्यांच्या मुलांच्या संगोपनाची जबाबदारी स्वखुशीने स्वीकारली. घराणे श्रीमंत असूनही फुले दांपत्याने तन-मन-धन समाजसेवेसाठी अर्पण केले. समाज परिवर्तनाच्या कार्यात त्यांनी स्वतःचा उदरनिर्वाह सुद्धा कठीण करून घेतला. त्यागमूर्ती महात्मा फुले यांचे योगदान आपण कधीही विसरता कामा नये, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांनी केले. लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात महात्मा फुले यांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पी. डी. गाथाडे, प्रा. दिलीप खडपकर व डॉ. सोपान जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गाथाडे यांनी केले तर आभार प्रा. दिलीप बर्वे यांनी मानले.










