
दोडामार्ग : स्थानिक पशुपालक हे केवळ आपल्या उपजीविकेचा आधार नसून आरोग्य, संस्कृती आणि पर्यावरणाचे खरे रक्षक आहेत. उन, वारा, थंडी-पावसाची तमा न बाळगता गाई-म्हशींचे पालन करणाऱ्या अशा मेहनती शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत कळणे-भिकेकोनाळ आणि भारतीय कृषी व कृषी पूरक शेतकरी गट, कळणे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीत शेतीपूरक भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले.
यंदाच्या उपक्रमांतर्गत पशुपालकांना प्लास्टिक घमेले भेटवस्तू म्हणून देण्यात आले. या कार्यक्रमास शेतकरी गटाच्या अध्यक्ष अनुश्री देसाई, उपाध्यक्ष सर्वेश देसाई, तसेच गुरु पावसकर, चंद्रशेखर कळणेकर, रामराव देसाई, पद्मलोचन सावंत, रवी नाईक, गुरु धुरी, नामदेव देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतकरी गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, कळणे सरपंच अजित देसाई, उपसरपंच काका देसाई आणि दोडामार्ग फळबागायतदार संघाचे अध्यक्ष संजय देसाई यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी उपस्थितांचे स्वागत व आभार शेतकरी गटाचे सचिव संदेश देसाई यांनी मानले.