
दोडामार्ग : तिलारी खोऱ्यातील हत्ती बंदोबस्तासाठी मारण्यात आलेल्या खंदकातील माती चिखल काल पडलेल्या पावसामुळे थेट विजघर दोडामार्ग मार्गावर आल्याने काल सोमवारी येथील प्रवाशांची वाहने अडकून पडली. येथील ग्रामस्थ व वाहन चालकाच्या सहाय्याने अडकलेली वाहने काढण्यात आली. मात्र हत्तीच्या बंदोबस्तासाठी मारलेला खंदक प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे.
तिलारी खोऱ्यात जंगली हत्तींचा दिवसा ढवळ्या हौदस वाढत आहे. यासाठी तिलारी विजघर येथे वनविभागाकडून खंदक मारण्यात आला होता. हा खंदक मारताना येथील मोठी झाडे मुळासकट काढण्यात आली होती. त्यामुळे येथील माती दगड भुसभुशीत झाली होती. याचा फटका आता येथील लगतच्या विजघर दोडामार्ग मार्गाला बसत आहे. काल सोमवारी मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे या खंदकातील माती चिखल या मार्गावर मोठ्या प्रमाणात आल्याने येथील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. या चिखलात घाट माथ्यावरील काही पर्यटकाची वाहने या चिखलात अडकली होती. मात्र अडकलेली वाहने येथील स्थानिक ग्रामस्थ व वाहन चालकाच्या सहाय्याने काढण्यात आली. त्यामुळे असे प्रकार येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या उत्सवात होऊ नये म्हणून वनविभागाने यावर तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी आता तिलारी खोऱ्यातील नागरिक व वाहन चालकातून होत आहे.