
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात चोरट्यांनी अक्षरशः थैमान घातले आहे. एकाच रात्रीत चार दुकाने फोडून डल्ला मारल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. पोलिसांनी या चोरांना तात्काळ जेरबंद करावे अशी मागणी केली जात आहे. दोडामार्ग बाजारपेठेतील एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चोरटा कैद झाला असून हेल्मेट घातलेले असल्यामुळे त्याची ओळख पटवणे कठीण झाले आहे. दोडामार्ग शहरातील दोन दुकाने, आंबेली येथील एक गॅरेज व साटेली–भेडशी परिसरातील एका सुपर मार्केट एकाच रात्रीत फोडली.
दुकानातील पैशांवर डल्ला मारला. शिवाय दुकानांचे सीसीटीव्ही कॅमेरे देखील चोरले. तालुक्यात अलीकडच्या काही दिवसांत चोरींच्या घटनात वाढ होत चालली आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण असून पोलिसांनी तातडीने सखोल तपास करावा व चोरांचा छडा लावावा. गस्त वाढवावी व बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ सुरू करावेत अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.











