ज्ञानदीप पुरस्कार वितरण सोहळा २५ डिसेंबर रोजी

गुणवंतांचा होणार सन्मान
Edited by: रुपेश पाटील
Published on: December 21, 2022 08:22 AM
views 242  views

सावंतवाडी : येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचे दरवर्षी दिले जाणारे जिल्हास्तरावरील २०२१, २०२२ या वर्षांचे पुरस्कार यापूर्वी जाहीर केले होते. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक २५ डिसेंबर रोजी श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी येथे सकाळी दहा वाजता आयोजित केला आहे.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते पुष्कराज कोले  उपस्थित राहणार आहेत.तसेच उद्घाटक राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, तर प्रमुख अतिथी कोकण विभागाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा अर्चना घारे-परब, ज्येष्ठ साहित्यिका उषा परब या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

या पुरस्काराचे मानकरी सागर चव्हाण ( मुख्य संपादक दै. कोकणसाद व कोकणसाद लाईव्ह), उपक्रमशील शिक्षिका अनुष्का नागेश कदम (मालवण), सातत्याने समाजाभिमुख कार्य करणारे  प्रा. एस. एन. पाटील (वैभववाडी), सुनील नाईक (तुळसुली), सूर्यकांत सांगेलकर (बांदा), बाळू कांडरकर (तळवडे), उपक्रमशील शिक्षिका शामल मांजरेकर (वेंगुर्ले), ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक शिवराम जोशी (माणगाव), हेमा नाईक (दोडामार्ग) यांचा ज्ञानदीप पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

तसेच यावेळी विशेष सन्मान म्हणून कु.जयदीप खोडके(मालवण),  सिनेअभिनेता प्रा. मिलिंद गुरव(कणकवली) व रेखा भुरे (विद्यमान संचालिका महिला पतपेढी, सावंतवाडी) यांचाही सन्मान केला जाणार आहे.

 ज्ञानदीप मंडळातर्फे गेली सलग सोळा वर्षे हा विधायक उपक्रम राबविला जात आहे. सामाजिक भान ठेवून विविध क्षेत्रातील समाजाभिमुख व्यक्तींना प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी ,या प्रामाणिक हेतूने ही संस्था जिल्ह्यात कार्यरत आहे.

      तरी या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष वाय. पी. नाईक, अध्यक्ष जावेद शेख, एस. आर. मांगले, निलेश पारकर, प्रा. रुपेश पाटील, विनायक गावस, राजेंद्र नारकर, रवीचंद्र नाईक व ज्ञानदीप परिवाराने  केले आहे