
देवगड : देवगड तालुक्यातील दीक्षित फाऊंडेशनतर्फे आयोजित कै.नीता निळकंठ दीक्षित यांच्या स्मरणार्थ आणि मंजिरी निरंजन दीक्षित यांच्या सौजन्याने, गीत गायन स्पर्धा येत्या ३ आणि ४ जानेवारी २०२६ रोजी वाडा – देवगड येथील श्री दत्त मंगल कार्यालयात संपन्न होणार आहे. या स्पर्धेसाठी बालगट, कुमारगट आणि खुला गट अशा तीन विभागांमध्ये गीतप्रकार निश्चित करण्यात आले असून, बालगटासाठी बालगीते, कुमारगटासाठी भक्तिगीते, तर खुल्या गटासाठी अभंग या प्रकारात स्पर्धकांना आपली कला सादर करता येणार आहे.
नावनोंदणीची अंतिम तारीख १५ डिसेंबर २०२५ अशी जाहीर करण्यात आली आहे. नावनोंदणी फक्त व्हॉट्सॲप संदेशाद्वारे स्वीकारली जाईल. स्पर्धेत विजेत्यांसाठी बालगटासाठी (1 ली ते 4 थी ) प्रथम पारितोषिक रु. 1500/-, व्दितीय 1000/-, तृतीय 750/-, उत्तेजनार्थ 500/-, कुमार गटासाठी (इ. 5 त 10 वी) प्रथम पारितोषिक 2000/- व्दितीय 1500/-, तृतीय 1000, उत्तेजनार्थ 500/-, खुला गटासाठी प्रथम पारितोषिक 5000/-, व्दितीय 4000/- , तृतीय 3000/-, उत्तेजनार्थ दोन बक्षिसे 1000/- अशी बक्षिसाची रक्कम असणार आहे.
गटानुसार नाव नोंदणीसाठी बालगट राधिका काणे 7588449605 , कुमारगट हर्षद जोशी 9421264371, खुला गट प्रियांका वेलनकर 9421938235 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन दीक्षित फाऊंडेशनतर्फे नागरिकांना, विशेषतः बालक व युवकांना, या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या कलागुणांना मंच मिळवण्याचे करण्यात आले आहे.
स्पर्धेसाठी अटी शर्ती
स्पर्धा सकाळी ८.३० वाजता सुरु होईल, स्पर्धक आणि सोबत येणाऱ्यांससाठी नाश्ता व भोजन व्यवस्था करण्यात येईल, स्पर्धकांनी स्पर्धेच्या दिवशी सकाळी उपस्थितीची प्रत्यक्ष नोंद करणे आवश्यक आहे, स्पर्धेच्या ठिकाणी सकाळी ८ वाजता नोंदणी सुरु होईल, ९ वाजता नोंदणी प्रक्रिया थांबवण्यात येईल, दि. ३ रोजी सुरुवातीला बालगटाची स्पर्धा घेण्यात येईल, ती संपल्यावर लगेचच कुमार गटाची स्पर्धा सुरु होईल, खुल्या गटाची स्पर्धा दि. ४ रोजी होईल, स्पर्धकांनी दिनांक १५ डिसेंबर २०२५ पर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे, गीतप्रकाराचे निकष विचारात घेऊन मराठी गीत निवडावे, गाण्याचे बोल, गाण्याची पट्टी नावनोंदणीच्या मेसेज मध्ये कळवणे अनिवार्य आहे, बालगटासाठी सादरीकरणासाठी वेळमर्यादाः किमान चार मिनिटे आणि कमाल सहा मिनिटे इतकी आहे (४+२=६), कुमार व खुला गट वेळमर्यादा किमान पाच मिनिटे आणि कमाल सात मिनिटे इतकी राहील. (५+२=७), सादरीकरण सुरु झाल्यानंतर आवश्यक किमान वेळ होताच वॉर्निंग बेल होईल तसेच गाण्यासाठी नेमून दिलेली वेळ पूर्ण झाल्यानंतर अंतीम बेल होईल, स्पर्धेला साथसंगतीसाठी हार्मोनियम, तबला आणि साईड रिदम (खंजिरी, झांज, चायनीज ब्लॉक, शेकर) एवढीच वाद्ये वापरण्यास परवानगी राहील, साथीदारांची व्यवस्था आयोजकांव्दारे करण्यात आली आहे. वादक / वाद्य जर स्पर्धक आणणार असेल तर नाव पुकारल्यानंतर मधला वेळ न घालवता वाद्यांची त्वरित मांडणी करून घ्यावी.
नाव पुकारल्यानंतर केवळ एक मिनिट वेळ देण्यात येईल आणि त्यानंतर असेल त्या स्थितीत गाण्याचा कालवधी सुरु झाल्याची बेल होईल, सादरीकरण वेळेत पूर्ण होण्यासाठी संपूर्ण गाणे सादर करणे अनिवार्य नाही. परंतु काही कडवी कमी केल्यास ती कमी करत असताना गाण्याचा अभिप्रेत अर्थ स्पष्ट होईल आणि तो बदलणार नाही यांचा विचार होणे अत्यावश्यक आहे, निवडलेल्या गीताच्या गीतकाराची/संगीतकाराची ते गीत या स्पर्धेत त्या स्पर्धकाने गाण्यासाठी काही हरकत नसेल याची खबरदारी त्या त्या स्पर्धकाने घ्यावी. तशी काही हरकत निकाल लागण्यापूर्वी आल्यास तो स्पर्धक या स्पर्धेतून बाद होईल, परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.अशा आयोजकांकडून सूचना देण्यात आल्या आहेत.










