पुढीलवर्षी देशपातळीवर नावाजलेले कलाकार दोडामार्गात आणणार : उद्योजक विवेकानंद नाईक

दोडामार्ग दीपावली शो टाईमचे शानदार उद्घाटन
Edited by: संदीप देसाई
Published on: November 27, 2023 17:57 PM
views 75  views

दोडामार्ग : शहरातील दीपावली शो टाईम हा खरा या शहरातील सांस्कृतिक चळवळीला उभारणी देणारा सांस्कृतिक कार्यक्रम असून पुढील वर्षी देशपातळीवर नावाजलेले मोठे कलाकार आम्ही शहरवासियांच्या भेटीला आणू. याहूनही अधिक दर्जेदार कार्यक्रम आपल्याला या व्यासपीठावरून आपल्याला पाहायला मिळतील अशी ग्वाही दोडामार्ग शहरातील प्रथितयश उद्योजक तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विवेकानंद नाईक यांनी दिली. 

   दोडामार्ग येथील वक्रतुंड मित्र मंडळ बाजारपेठ दोडामार्ग आयोजित दीपावली शो टाईम चे शानदार उद्घाटन उद्योजक विवेकानंद नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष चेतन चव्हाण उपनगराध्यक्ष देविदास बांधकाम सभापती नितीन मणेरीकर, दैनिक कोकणसादचे संपादक संदीप देसाई, उद्योजक दत्ताराम बाबा टोपले, सुनील गवस, वक्रतुंड मंडळाचे अध्यक्ष मनोज पार्सेकर, उपाध्यक्ष प्रकाश सावंत, विशाल मणेरीकर, रंगनाथ गवस, परीक्षक दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

  यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी मंडळाचे कौतुक करताना दोडामार्ग शहर वासियांना सांस्कृतिक मेजवानी देण्यासाठी आम्ही वक्रतृंडच्या माध्यमातुन सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. शहर वासियांच्या खंबीर साथीने नगरपंचायत कोकण आणि राज्यात आदर्शवत काम करत असल्याचे सांगत येत्या मे महिन्यात दोडामार्ग महोत्सव आयोजन करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. 

 दैनिक कोकणसादचे संपादक संदीप देसाई यांनी वक्रतुंड मंडळाच्या कार्याचे कौतुक केलं. सलग सोळा वर्षे दीपावली शो टाईमचे आयोजन करताना दरवर्षी उत्तरोत्तर प्रगती करत या मंडळाने बड्या शहरांप्रमाणे दोडामार्ग शहरात खुल्या रंगमंचावर दीपावली शो टाईम आयोजन करून शहर व तालुक्यातील सांस्कृतिक चळवळीला गती दिल्याचे सांगितलं. या मंडळाने अशीच उत्तरोत्तर प्रगती करावी मीडियाच्या माध्यमातून लागेल ते सहकार्य करण्याचा शब्द त्यांनी या मंडळला दिला.

मंडळाचे अध्यक्ष मनोज पार्सेकर यांनी प्रास्ताविकात मंडळाची वाटचाल विशद केली. कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष आणि पदाधिकारी जरी जनतेसमोरील असले, तरी या  आयोजनामागे वक्रतुंड मित्र मंडळाच्या प्रत्येक सभासदाचा तितकाच सहभाग असल्याचं जाहीर केलं. ग्रामीण तालुक्यात असे भव्य दिव्य कार्यक्रम आयोजन करणे तितकं सोपं काम नव्हे, पण या शहरातील उद्योजक विवेकानंद नाईक, नगराध्यक्ष चेतन चव्हाण  यांच्यासारख्या दातृत्वत्वान व्यक्तींमुळे हे सारं घडवून आणता येत. आगामी काळात याहूनही अधिक चांगले कार्यक्रम दिपाली शो टाईम च्या माध्यमातून आपल्या भेटीस आणण्याची त्यांनी स्पष्ट केलं. उपस्थित मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन करणेत आले. सूत्रसंचालन पत्रकार सुमित दळवी यांनी केलं.

मोबाईल टिव्ही च्या जमान्यात व्यासपीठावर आपली संस्कृती दर्शविणारे व छत्रपतींचे विचार आजच्या पिढीला देणारे कार्यक्रम वक्रतुंड मित्र मंडळाच्या रंगमंचावर दीपावली शो टाईम च्या माध्यमातून होत असल्याने अतिशय आनंद होतो. फॅन्सी ड्रेस स्पर्धेच्या माध्यमातून चिमुकल्यांनी सादर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज राखणदार झाशीची राणी लक्ष्मीबाई सफाई कामगार या व्यक्तिरेखा हृदयाला भिडणाऱ्या आणि आपली संस्कृती परंपरा पुढे नेणाऱ्या आहेत. यासाठी या मुलांबरोबरच त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या त्यांचे आई वडील यांचंही कौतुक विवेकानंद नाईक यांनी केलं.