
सिंधुदुर्गनगरी : आपला जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सक्षमपणे काम करावे. विशेषत: तरुण पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्यामध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. महसूल विभाग, पोलिस विभाग आणि औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांनी एम.आय.डी.सी. परीसरात नियमित भेटी देऊन अंमली पदार्थ विरोधी कार्यवाहीची मोहिम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.
अंमली पदार्थ अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय नार्को को ऑर्डनेशन समितीची बैठक पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे हे प्रत्यक्ष तर सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन एस.पी. यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. सई धुरी, तसेच शिक्षण विभाग, उत्पादन शुल्क विभाग, बंदर विकास विभाग, समाज कल्याण विभाग, पोस्ट ऑफिस व इतर विभागातील अधिकारी तसेच कर्मचारी दूरदृष्य प्रणालीव्दारे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाल्या की, तरुण पिढी ही देशाचे भविष्य आहे. अंमली पदार्थापासून तरूण पिढीचे रक्षण होणे आवश्यक आहे. सिंधुदुर्ग जिल्हा अंमली पदार्थ मुक्त होण्याच्या दृष्टीने अंमली पदार्थ विरोधी पथका मार्फत विविध ठिकाणचे चेकपोस्ट व पर्यटन स्थळी अचानक भेट देऊन तपासणी करावी. पोलिस प्रशासन आणि औषध प्रशासन विभागाने संयुक्तपणे जिल्ह्यातील एम.आय.डी.सी परिसरात नियमित तपासणी करावी. परदेशी नागरिकांच्या वास्तव्याची संबंधित हॉटेल चालक आणि होम स्टे धारकांनी पोलिस स्टेशनला माहिती द्यावी. शालेय शिक्षण विभागाने शाळेच्या १०० मीटर परिसरात कोणत्याही टपरी व दुकानांमध्ये अंमली पदार्थाची विक्री अथवा साठवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. पुढील शैक्षणिक वर्षामध्ये शाळा, महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने आराखडा बनवून अंमलबजावणी करावी. सिंधुदुर्ग जिल्हा अंमली पदार्थ मुक्त होण्याच्या दृष्टीने सर्व विभागाने पोलीस विभागाशी समन्वय ठेवून अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन होईल याकरिता प्रयत्न करावेत व अंमलबजावणी करावी असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आवाहन केले आहे










