
सावंतवाडी : महसूल विभागातील महसूल सेवक (कोतवाल) या पदाला शासकीय चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा या त्यांच्या प्रदीर्घ मागणीसाठी महसूल सेवक (कोतवाल) संघटनेने नागपूर संविधान चौक येथे पुकारलेल्या राज्यव्यापी कामबंद व अन्नत्याग आंदोलनास आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघटनेने पाठिंबा दर्शवला आहे. कोतवालांची ही मागणी अत्यंत न्याय व रास्त असून, शासनाने तातडीने या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना चतुर्थ श्रेणी लागू करावी, अशी विनंती तलाठी संघटनेने केली आहे.
तलाठी संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार, महसूल सेवक (कोतवाल) हे महसूल विभागाच्या कामकाजाचा एक अविभाज्य आणि अत्यंत महत्त्वाचा घटक आहेत. राज्य शासनाच्या विविध योजना, धोरणे आणि उपक्रमांची गावपातळीवर यशस्वी अंमलबजावणी करण्याची महत्त्वाची जबाबदारी कोतवाल पार पाडतात. ते ग्राम महसूल अधिकारी कार्यालय (सजा) तसेच वरिष्ठ महसूल कार्यालयात चोवीस तास तत्पर सेवा देतात. महसूल कामकाजासोबतच निवडणूक विषयक कामे, ई-पीक नोंदणी, नैसर्गिक आपत्तीमध्ये पंचनामा करणे, महसुली वसुली, तसेच वरिष्ठ कार्यालयाने वेळोवेळी दिलेली बिगर महसुली कामेही कोतवालांना करावी लागतात.
इतके महत्त्वाचे आणि चोवीस तास काम करूनही आजतागायत शासनाकडून महसूल सेवक (कोतवाल) पदास शासकीय वर्गीकृत कर्मचाऱ्यांप्रमाणे 'चतुर्थ श्रेणी' दर्जा देण्यात आलेला नाही, ही मोठी खेदाची बाब आहे. कोतवाल हे ब्रिटिशकालीन पद असून, त्यांचे काम आणि महसूल यंत्रणेतील त्यांचे स्थान लक्षात घेता त्यांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे, महाराष्ट्र राज्य महसूल सेवक (कोतवाल) संघटनेने चतुर्थ श्रेणी मिळवण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा आहे. कोतवाल बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने तातडीने चतुर्थ श्रेणी लागू करावी, अशी जोरदार मागणी तलाठी संघटनेने केली आहे.










