सिंधुदुर्ग बंदमध्ये जिल्हा राष्ट्रवादी (एसपी) सहभागी होणार : अमित सामंत

Edited by:
Published on: August 23, 2024 11:31 AM
views 265  views

कुडाळ : जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात बदलापूर येथील शालेय विद्यार्थीनीवर अमानुषपणे झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या माध्यमातून बंद पुकारण्यात येत असून या बंद मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्ह्यातील सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आप आपल्या तालुक्यात महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे.

ही घटना म्हणजे महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसवून महायुती सरकारचा कारभार सुरू आहे,हे राज्य सरकारचे सपशेल अपयश असून महायुतीच्या सत्तेच्या काळात महाराष्ट्रात अशा अनेक घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.महाराष्ट्रातील  कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महायुती सरकार व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्णपणे अपयशी ठरले,बदलापूरच्या निंदनीय घटनेला गृहमंत्री देवेद्र फडणवीस आणि त्यांचे गृहखाते जबाबदार आहे,यांची जबाबदारी स्वीकारून यांना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. बदलापूरमध्ये घडलेली घटना ही महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे. गृहमंत्री याबाबत कठोर निर्णय घेऊ शकत नाहीत,पिडीत कुटुंबातील व्यक्ती या घटनेची तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन न्यायाची अपेक्षा करत असतानाही तब्बल  बारा तास नातेवाईकांना तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये ताटकळत बसवून ठेवण्यात आले,याच अर्थ राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या आशीर्वादानेच असले प्रकार होत आहेत,महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून गुन्हेगारांना गुन्हे करण्यासाठी महायुती सरकार व गृहमंत्री खतपाणी घालत असल्याचा आरोप अमित सामंत यांनी केला.

त्यामुळे महाराष्ट्रातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे,मुख्यमंत्री गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बदलापूरच्या घटनेपेक्षा लाडक्या बहिणींच्या मतांची चिंता महत्वाची वाटते,पण महायुती सरकारच्या राजवटीत या लाडक्या बहिणीच जर बेरक्या भावाच्या सत्तेत सुरक्षित नसतील तर काय?पण याच लाडक्या बहिणी या बेरक्या भावांना महाराष्ट्राच्या सत्तेच्या सिंहासनावरून खड्या सारखे बाजूला फेकून देतील याचे भान लाडके मुख्यमंत्री,गृहमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी ठेवावे,बदलापूरच्या अमानुष कृत्याची जराजरी लाजलज्या राज्यकर्त्यांना असेल तर बदलापूरच्या घटनेची जबाबदारी स्वीकारून सत्तेतून पायउतार व्हावे,असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार)जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिले असून, बदलापूर येथील शालेय विद्यार्थीनीवरील झालेल्या लैंगिक अमानुष घटनेचा निषेध व्यक्त करत असून न्याय मिळेपर्यंत पिडीत कुटूंबियांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठामपणे सोबत असल्याचे सांगून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उद्याच्या महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त पाठिंबा देण्यासाठी आणि महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसविणाऱ्या महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी या बंद मध्ये आपण आपआपल्या तालुक्यात महाविकास आघाडी सोबत सहभागी व्हावे, अशी विनंती जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केली आहे.