चांगले काम होत नसेल त्याठिकाणी संघटनेत बदल करण्याचे अधिकार जिल्हाप्रमुखांना : विनायक राऊत

जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याचा शिवसेना नेते, पदाधिकाऱ्यांनी केला निर्धार
Edited by:
Published on: January 17, 2025 20:08 PM
views 33  views

सिंधुदुर्ग : विधानसभा निवडणुकीत यश मिळाले नसले तरी आपल्या पक्षाला मिळालेली मते आणि सत्ताधाऱ्यांना मिळालेली मते यात फार मोठा फरक नाही. त्यामुळे आपण कमकुवत आहोत असे समजू नका आपल्या पक्षावरही अनेक मतदारांनी विश्वास दाखवला आहे. त्याविश्वासाला  पात्र ठरण्यासाठी सर्वांनी जनतेत मिसळून काम केले पाहिजे. आपल्याजवळ असलेल्या पदाला न्याय दिला पाहिजे. ज्याठिकाणी चांगले काम होत नसेल त्याठिकाणी संघटनेत बदल करण्याचे अधिकार  शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाना आहेत.चांगले काम करणाऱ्यांना संघटनेत संधी दिली जाणार असल्याचे शिवसेना नेते, मा. खा. विनायक राऊत यांनी सांगितले. 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची बैठक आज ओरोस येथील शरद कृषी भवन येथे संपन्न झाली. यावेळी जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याचा निर्धार शिवसेना नेते, पदाधिकाऱ्यांनी केला.  यावेळी उपनेते, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर,माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, ब्रि. सुधीर सावंत, उपनेत्या जान्हवी सावंत, महिला  जिल्हा संघटक श्रेया परब, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, अमरसेन सावंत, डॉ. जयेंद्र परुळेकर, गितेश राऊत, नागेंद्र परब,रुपेश राऊळ,हरी खोबरेकर, राजन नाईक,कन्हैया पारकर, मंगेश लोके, मिलिंद साटम, जयेश नर, मायकल डिसोजा,संजय गवस,बाळू परब, बबन बोभाटे,मंदार केणी,सचिन कदम, बाळा कोरगावकर,अनुप नाईक,किरण शिंदे, उदय मांजरेकर,दीपा शिंदे,स्नेहा दळवी,श्रुती वर्दम,श्रेया गवंडे,सई काळप,ज्योती जळवी, निनाक्षी मेथर यांसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.                                                                                       

यावेळी अरुण दुधवडकर म्हणाले, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आपला पराभव झाला असला तरी थांबून चालणार नाही. येत्या काळात मोठा विजय मिळविला पाहिजे. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या तत्वावर काम करून विविध समाजपयोगी कार्यक्रम आपण घेतले पाहिजेत असे सांगितले. 

वैभव नाईक म्हणाले, विरोधी पक्ष म्हणून आपण काम करत आहोत.आपल्याबरोबर जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या पाठीशी आपण राहिले पाहिजे. कार्यकर्त्यांनी मेहनत घेतल्यामुळेच जिल्ह्यातील अनेक बुथवर आपल्याला लीड भेटले आहे. ज्या ठिकाणी आपण कमी पडलो त्याठिकाणी लक्ष देऊन पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. 

राजन तेली म्हणाले, आताची परिस्थिती अशीच राहणार नाही उद्या हे चित्र बदललेलं  असेल. मात्र आपण नाउमेद होता कामा नये. परिस्थितीशी संघर्ष करुन शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी सर्वानी प्रयत्न केला पाहिजे. संदेश पारकर म्हणाले, कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून पुन्हा उमेदीने काम करणे गरजेचे आहे. लोकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणे, समाजात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टीना विरोध करणे हा शिवसेनेचा स्थायीभाव आहे. तो आपण जपला पाहिजे असे सांगितले. सतीश सावंत म्हणाले, जिल्ह्यातील प्रश्नांवर आपण आवाज उठविला पाहिजे. येणाऱ्या निवडणूका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणूका आहेत. त्या निवडणूका जिंकण्यासाठी आपण पूर्ण ताकद लावली पाहिजे असे सांगितले.