जिल्हा वीज ग्राहक संघटना - व्यापारी महासंघ बुधवारी घेणार अधीक्षक अभियंत्यांची भेट

वीज प्रश्न सोडविण्याची करणार मागणी
Edited by:
Published on: January 06, 2025 16:57 PM
views 176  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना व व्यापारी महासंघाच्या वतीने बुधवार ०८ जाने. २०२५ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता कुडाळ येथील अधीक्षक अभियंता, महावितरण सिंधुदुर्ग यांची भेट घेऊन जिल्ह्यातील व्यापारी व वीज ग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत निवेदन देऊन जिल्ह्यातील वीज प्रश्न सोडविण्यात मागणी करण्यात येणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीजेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून वीज ग्राहकांची होणारी वाढ आणि अनियमित पुरवठा, कालबाह्य झालेले महावितरणचे इन्फ्रास्ट्रक्चर, अपुरी सबस्टेशन, जुनाट ट्रान्सफॉर्मर, मोडकळीस आलेले विद्युत खांब, जुनाट तारा यामुळे कित्येकदा व्यापारी, व्यावसायिक आणि सामान्य वीज ग्राहकांना अंधारात राहण्याची वेळ येते.

त्यामुळे व्यापारी, व्यावसायिक यांचे अतोनात नुकसान होते. जिल्ह्यात भेडसावणाऱ्या या समस्या पुन्हा एकदा अधीक्षक अभियंता यांच्या समोर मांडून जिल्ह्यातील वीज प्रश्नांना वाचा फोडण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सामान्य वीज ग्राहक, व्यापारी, व्यावसायिक, कारखानदार, सरपंच आदींना आवाहन करण्यात येत आहे की, आपापल्या विभागातील, गावातील, शहरातील समस्या लेखी स्वरूपात जिल्हा, तालुका वीज ग्राहक संघटनेकडे देऊन त्याची एक प्रत आपल्यासोबत घेऊन बुधवारी सकाळी ११.०० वाजता अधीक्षक अभियंता कार्यालय, एमआयडीसी, कुडाळ येथे उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.