
सिंधुदुर्गनगरी : निवडणूक कालावधीत मिडिया कक्षाचे आणि विशेषत: माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीचे कार्य महत्वाचे आहे या समितीद्वारे राजकीय जाहिरातीचे प्रमाणिकरण करणे, जाहिरातींवर होणाऱ्या खर्चाची माहिती नियमितपणे खर्च विभागाला सादर करणे एमसीएमसीची मुख्य जबाबदारी असून याकडे बारकाईने लक्ष देण्याचे आवाहन सिंधुदुर्गचे जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे यांनी केले. जिल्हा माहिती कार्यालयाने स्थापन केलेल्या मिडिया कक्ष आणि माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण कक्षाला ( एमसीएमसी ) त्यांनी आज भेट दिली.
तावडे म्हणाले, उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या दृष्टिकोनातून मुद्रीत व इलेक्ट्रॉनिक्स जाहिरातीवर लक्ष ठेवणे, मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे तसेच सोशल माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या जाहिराती, बातम्या, पोस्ट, पेड न्यूज आहेत का यावर लक्ष ठेवणे, निवडणूक आचारसंहिता कालावधीत मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होणारे वृत्त जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्यावे असेही ते म्हणाले.
एमसीएमसीचे सदस्य सचिव तथा माध्यम कक्षाचे प्रमुख जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी एमसीएमसी समिती आणि मिडिया कक्षामार्फत करण्यात येणाऱ्या कामांची माहिती त्यांना दिली. या समिती मार्फत इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये प्रसारित होणाऱ्या राजकीय जाहिरातींना प्रमाणित केले जाते. याशिवाय वृत्तपत्रात, विविध वाहिन्यांवर तसेच सोशल माध्यमांवर उमटणाऱ्या जाहिराती, बातम्या, पोस्ट बघून यामध्ये पेड न्यूजच्या प्रकारात माहिती दिली तर जात नाही याचे निरीक्षण केले जाते. सोशल माध्यमांवर छुपा प्रचार सुरू तर नाही ना याची देखील पाहणी केल्या जाते. छुप्या पद्धतीने, परवानगी न घेता पेड न्यूजच्या माध्यमाने उमेदवारांनी प्रचार सुरू केला असल्यास एमसीएमसी समिती झालेला सर्व खर्च त्यांच्या खात्यामध्ये जिल्ह्याच्या खर्च विभागामार्फत दाखल केल्या जात असल्याचेही श्री चिलवंत यांनी सांगितले. यावेळी परिविक्षाधीन जिल्हाधिकारी विशाल खत्री, उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे तसेच समितीचे सदस्य उपस्थित होते