हरकुळ बुद्रुक नुकसानग्रस्त भागात जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट

Edited by: उमेश बुचडे
Published on: May 17, 2024 13:56 PM
views 103  views

कणकवली : वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा हरकुळ बुद्रुक गावातील शेखवाडी व खडकवाडीला मोठा फटका बसला. पाऊस व जोरदार वादळामुळे भागातील अनेकांच्या घराचे छप्पर,पत्रे, कौले उडून गेली आहेत. तर विद्युत तारा व पोल कोसळुन मोठे नुकसान झाले. आमदार नितेश राणे यांनी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणांना नुकसानग्रस्त भागात जाऊन तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी शुक्रवारी सायंकाळी हरकुळ बुद्रुक येथे नुकसानग्रस्त झालेल्या शेखवाडी व खडकवाडी येथील नुकसान झालेल्या घरांची पहाणी केली. 

यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे, महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते,भाजपाचे पदाधिकारी  यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. किशोर तावडे यांनी नुकसानग्रस्तांची चर्चा केली. विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे शेखवाडी व खडकवाडीला होणारा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. शुक्रवारी सकाळापासून महावितरणकडून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला नुकसानग्रस्त नागरिकांचे पंचनामे करा तसेच विद्युत पुरवठा सुरळीत करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत.